esakal | तौक्ते वादळ: जाणून घ्या दिवसभरात काय-काय घडलं...
sakal

बोलून बातमी शोधा

तौक्ते वादळ: जाणून घ्या दिवसभरात काय-काय घडलं...
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला नुकसानीचा आढावा

  • राज्यात वादळाचे ६ बळी; ९ जण जखमी

  • एकूण अडीच हजार घरांचे नुकसान

  • मुंबई पालिकेकडून पडलेली झाडं, खांब बाजूला करण्याचे काम सुरू

  • रात्री वाऱ्याचा वेग कमी होणार; हवामान विभागाचा अंदाज

तौक्ते वादळ: जाणून घ्या दिवसभरात काय-काय घडलं...

sakal_logo
By
विराज भागवत

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदतकार्य वेगाने सुरु ठेवावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे, याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. (Cyclone Tauktae Full Day Updates CM Uddhav Thackeray takes Review)

हेही वाचा: Video: मरीन ड्राइव्हवर दिसलं समुद्राचं रौद्र रूप

रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील, याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तौक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले.

हेही वाचा: भर समुद्रात बार्ज भरकटलं; मुंबईतून दोन युद्धनौका रवाना

सुमारे अडीच हजार घरांचे नुकसान; ६ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

तौक्ते या चक्रीवादळामुळे एकूण २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा समावेश आहे. राज्यात ठाण्यात २, रायगडमध्ये ३ तर सिंधुदुर्गमध्ये १ असे एकूण ६ जण मरण पावले. याशिवाय, मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी झाली. तसेच रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी एकूण ४ जनावरे मरण पावली. मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू

वाऱ्याचा वेग कमी होणार!

मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. सोमवारी 5 वाजेच्या स्थितीनुसार हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किमी प्रती तास इतका होईल. पुढे तो आणखी ओसरेल, असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरामध्ये धडकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Cyclone Tauktae: मुंबईतील विमानसेवा ८ वाजेपर्यंत बंदच

मुंबई पालिकेकडून पडलेली झाडं, खांब बाजूला करण्याचे काम सुरू

मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली. तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.