डहाणूच्या शिक्षकाची 'गिनेस'मध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

डहाणू - गोवणे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विजय बाळासाहेब पावबाके यांनी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांची मांडणी सर्वांत जलद करून "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नाव नोंदविले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बोलीभाषा म्हणून मान्यता असलेल्या या भाषेच्या वर्णाक्षरांची मांडणी आदिवासी भागातील मराठी माध्यमाच्या शिक्षकाने केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मार्च महिन्यात पावबके यांची मुलगी आरोही हिने "इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये चार विक्रमांची नोंद केली होती. याशिवाय काही महिन्यांपूर्वी गोवणे शाळेचा विद्यार्थी करण यानेदेखील जास्तीत जास्त वेळ पायांच्या तळव्यांवर उभे राहण्याच्या विक्रमाची नोंद "चिल्ड्रेन रेकॉर्ड बुक'मध्ये केली होती. या विक्रमांतूनच विजय यांनीदेखील प्रेरणा घेताना "फास्टेस्ट टू ऍरेंज अल्फाबेट्‌स' हा विक्रम मोडायचा निश्‍चय केला. यापूर्वी हा विक्रम ब्रिटनच्या हॅरी स्ट्रेचर (30.50 सेकंद) यांच्या नावावर सप्टेंबर 2011 मध्ये नोंदवला गेला होता. पावबाके यांनी 28.45 सेकंदामध्ये मांडणी करताना विक्रम नोंदविला.

चार महिने सराव
याबाबत "गिनेस'च्या टीमकडून सर्व नियमावली त्यांनी अभ्यासली होती. दोन साक्षीदार, दोन टाइमकीपर, दोन व्हिडिओ शूटर, प्लॅस्टिक अल्फाबेट्‌स व स्टेन्सिल बोर्ड हे साहित्य जमवून त्यांनी सराव सुरू केला. पहिल्या प्रयत्नात त्यांना अडीच मिनिटे एवढा वेळ लागला. त्यानंतर सलग चार महिने सराव केल्यानंतर दिवाळीत या विक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले.

Web Title: dahanu mumbai news teacher grinich book record