
कासा : डहाणू पोस्ट कार्यालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून, ती अत्यंत धोकादायक ठरली आहे. पावसाळ्यात छत व भिंतीतून पाणी शिरल्याने कार्यालयातील कामकाज करणे अवघड झाले होते. इमारतीची अवस्था एवढी ढासळलेली आहे की ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्याने अखेर १८ ऑगस्टपासून कार्यालयाचे कामकाज तात्पुरते डहाणू गावातील दुसऱ्या पोस्ट कार्यालयात हलवण्यात आले आहे.