अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुंबई : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. 

मुंबई : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. 

गेल्या काही वर्षांपासून अलिबागमधील दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यात गेल्या वर्षी जाचक अटींमुळे उत्सव साजरा करण्यात आला नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी गोपाळकाल्यानिमित्त अलिबागमधील शेतकरी भवनसमोर हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सव स्पर्धेचे स्वरूप तालुकास्तरीय असून अटींचे पालन करणाऱ्या गोविंदा पथकाला प्रवेश देण्यात येणार आहे.

स्वर्गीय नमिता नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला गोविंदा पथकालाही स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी विशेष बक्षीस दिले जाणार आहे. या दिवशी चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले असून आकर्षक चित्ररथांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. प्रशासकीय आवश्‍यक परवानग्या घेऊन लवकरच स्पर्धेची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशांत नाईक यांनी सांगितले.

या वेळी अलिबाग नगर परिषदेचे बांधकाम सभापती ऍड. गौतम पाटील, गटनेते प्रदीप नाईक, नगरसेवक अजय झुंजारराव, अनिल चोपडा, महेश शिंदे, राकेश चौलकर, ऍड. सचिन जोशी, अशोक प्रधान, अनिरुद्ध आठवले, संजय सारंग, संदीप कीर, तुषार वाईकर, राकेश जगताप, विकास पाटील, महेश पाटील, अरुण पाटील, मयूर डाभी, सागर भगत आदी पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi festival in Alibaug