भिवंडीत धोकादायक इमारतींची समस्या बिकट, एकूण 527 धोकादायक इमारती

शरद भसाळे
Wednesday, 30 September 2020

सध्या शहरात तब्बल 517 तीस वर्षांहून जुन्या इमारती असून त्यापैकी फक्त 47 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. तर 470 इमारती अजूनही वापरात आहेत.

मुंबईः भिवंडी पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारत दुर्घटनेचा भयंकर प्रकार प्रथमच भिवंडीत झाला नसून या पूर्वी देखील इमारती कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 20 हून अधिक रहिवाशी मृत्युमुखी पडले होते. अशी परिस्थिती असतानाही महापालिका आयुक्त प्रशासनाने कोणतीही ठोस उपाय योजना न केल्याने शहरात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा पालिकेच्या आयुक्त प्रशासनासमोर आव्हान म्हणून उभा ठाकला आहे.

सोमवार 21 सप्टेंबरच्या पहाटे पटेल कंपाऊंड येथील जिलानी बिल्डिंग दुर्घटना अधोरेखित झाले आहे. 2020 या वर्षातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून या घटनेकडे बघितले जात आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम, धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींची समस्या जटिल होत चालली आहे. भिवंडी शहरात तीस वर्षांहून जुन्या इमारती मोठ्या संख्येने आहे. अशा इमारतींना नोटीस दिल्यावर थोडीफार डागडुजी रंगरंगोटी करून या इमारती वापरात आहेत. सध्या शहरात तब्बल 517 तीस वर्षांहून जुन्या इमारती असून त्यापैकी फक्त 47 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. तर 470 इमारती अजूनही वापरात आहेत. या इमारतींमधून हजारो कुटुंबीय आपला जीव टांगणीला ठेवून वास्तव्य करीत असल्याचे वास्तव चित्र पालिके समोर आहे.

अधिक वाचाः  ICMRचा दुसरा सेरो सर्व्हे अहवाल सादर, मुंबईतली परिस्थिती चिंताजनक

भिवंडी शहरात जुन्या इमारतींसह धोकादायक आणि अति धोकादायक अशा दोन श्रेणींमध्ये धोकादायक इमारतींची विभागणी विविध श्रेणी केली गेली आहे. त्या मध्ये श्रेणी 3 या दुरुस्ती ,श्रेणी  2 - ब  या दुरुस्ती शक्य असलेल्या  श्रेणीत तब्बल 420 इमारतींचा समावेश आहे. तर श्रेणी 1 आणि श्रेणी  2 - अ  या अतिधोकादायक 107 इमारतींचा समावेश होत आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची शक्य असल्यास दुरुस्ती करून वापर करता येणे शक्य असल्याने बऱ्याच वेळा अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या वापर योग्य असल्याचा दाखला घेऊन वापर करता येणे शक्य आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेतला जात आहे. 

अधिक वाचाः महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये मुंबई शहर देशात दुसऱ्या स्थानावर

श्रेणी  2- अ  या इमारत रिकामी करून तिची दुरुस्ती करण्याचा समावेश होत असल्याने या श्रेणीत भिवंडी शहरातील 82 इमारतींचा समावेश आहे. त्यामधील तब्बल 40 इमारतींची दुरुस्ती झाली असून 32 इमारती निर्मनुष्य, 5 इमारती निष्कासन आणि 5 इमारती प्रकरणी न्यायालयीन वाद उपस्थित झाला आहे. तर श्रेणी 1 या अतिधोकादायक श्रेणीत सदर इमारती तात्काळ निष्कासन करण्याच्या गटात 25 इमारती असून त्यापैकी 19 निर्मनुष्य तर 6 इमारती निष्कसन करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. 

श्रेणी  2 - ब  या दुरुस्ती होण्यालायक असलेल्या इमारतींची संख्या 198 असून त्यामध्ये दुरुस्ती झालेल्या 151, दुरुस्ती सुरू असलेल्या 5, निष्कासन 8, निष्कासन सुरू असलेली 1, निर्मनुष्य 8, पाणी पुरवठा खंडित केलेल्या 3, न्यायालयीन प्रक्रिया 8, स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या 2 तर कारवाई न झालेल्या 12 इमारतींचा समावेश आहे.

भिवंडी शहरातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींची समस्या गंभीर असताना होणारी कारवाई माणुसकीच्या दृष्टीकोनातून अत्यंत संथगतीने होत आहे. मात्र पुन्हा भिवंडीत दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

Dangerous buildings total Count of 527 in Bhiwandi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous buildings total Count of 527 in Bhiwandi