Dasara Melava 2022 : ठाकरे, शिंदेच्या दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी एसटीची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

Dasara Melava 2022 : ठाकरे, शिंदेच्या दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी एसटीची मदत

मुंबई : शिवसेना नेमकी कोणाच्या हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शक्ती प्रदर्शन करणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी मैदान मिळू नये यासाठी सुरुवातीला शिंदे गटाने खेळी खेळली होती, मात्र यश न आल्याने आता शिवसैनिकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आम्हीच विचारांचे वारस म्हणून टिझर रिलीज करत, राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांना बीकेसी मैदानावर आणण्यासाठी विभाग पातळीवर एसटी बसेसचे शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने बुकिंग करण्यात आले असून, सुमारे १९०० बसेससाठी ११ कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा आतापर्यंत भरणा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडूनही शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा पहिला मेळावा असेल अशी जय्यत तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्याप्रमाणे यावेळच्या मेळाव्यात गर्दी कमी पडू. नये यासाठी पूर्ण ताकत लावल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिक, आणि सामान्य शिवसैनिकांना मुंबई पोहचता यावे यासाठी सुमारे १५० बसेस आरक्षित केल्याची माहिती मिळत आहे. वेळेपर्यंत दोन्ही गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या बसेसची संख्या अजूनही अंतिम टप्प्यात पोहचली नसून, शेवटच्या टप्यात संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही एसटीचे अधिकारी सांगत आहे.

सर्वसामान्यांचे हाल होतील...

दसऱ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिक आपल्या कुलदैवत, नातेवाकांकडे जात असतात, दसऱ्याच्या निमित्ताने एसटीच्या उत्पनातही भर पडते, मात्र सद्या एसटी महामंडळाकडे आधीच एसटी बसेसची संख्या कमी असल्याने आधीच अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. त्यातच आता प्रत्येक विभागातील बसेसची संख्या ऐन दसऱ्याच्या दिवशी कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गट म्हणून कोणत्याही नेत्यांनी एसटी बसेसची बुकिंग केली नाही. प्रत्येक विभागाच्या स्तरावर ही बुकिंग सुरू आहे. सुमारे आतापर्यंत १८०० बसेस बुकिंग करण्यात आल्या असून, साधारण साडे नऊ कोटींच्या घरात या बसेसचे भाड्याचे मूल्य होण्याची शक्यता आहे.

- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, वाहतूक