वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी मंजुरी दिली आहे.

मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी मंजुरी दिली आहे. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी 2020 अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमबीबीएस, डेंटल, बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 ते 27 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

वाचा ः लॉकडाऊनवर भाष्य करणाऱ्या 'उठेंगे हम' चित्रफितीचा डिजिटल प्रीमियर

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी उन्हाळी 2020 परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी राज्यपालांकडे दर्शवली होती. त्यानुसार राज्यपालांनी परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेची तयारी सुरु करत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एमबीबीएसची परीक्षा 16 ते 22 जुलै, डेंटलच्या 16 ते 23, बीएएमएसच्या 16ते 27, बीयूएमएस 16 ते 25 आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाची परीक्षा 16 ते 25 जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे बेसिक बीएससी नर्सिंगची परीक्षा 16 ते 18, पी.बी. बीएससी नर्सिंगची परीक्षा 16 ते 20 जुलैला होणार आहेत. त्याचप्रमाणे बॅचलर फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांचीही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

वाचा ः अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शंका निरसनासाठी हेल्पलाईन नंबर परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना इमेल, मेसेज आणि व्हाट्सअपच्या माध्यामातून कळवण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शाखानिहाय हेल्पलाईन क्रमांक विद्यापीठाने संकेतस्थळावर दिले आहेत. तसेच पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ugmuhssummerexam2020@gmail.com, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी pgmuhssummerexam2020@gmail.com या मेल आयडीवर विद्यार्थ्यांना मेल करता येणार आहे.

वाचा ः आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर​

घराजवळील परीक्षा केंद्रावर देता येणार परीक्षा
उन्हाळी 2020 लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात घेण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक गावातील, नजिकचे पसंतीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पालकांचे निवासी शहर असल्याचे प्रमाणपत्र व स्वाक्षांकित अर्ज घेऊन ते 12 जूनपर्यंत विद्यापीठाच्या संबंधित विद्याशाखेच्या इमेलवर पाठवायची आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी केंद्र न मिळाल्यास स्वतःच्याच महाविद्यालयात परीक्षाकेंद्र असणार आहे.

वाचा ः बापरे! मुंबईतून गावी गेलेल्या स्थलांतरितांची उत्तर प्रदेशात दहशत; तब्बल 'इतके' जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह..​

या अभ्यासक्रमाची होणार परीक्षा

  •  एमबीबीएस : तिसरे वर्ष (2)
  •  बीडीएस चौथे वर्ष जुना आणि नवीन वर्ष
  •  बीयुएमएस - नवीन अभ्यासक्रम तिसरे वर्ष आणि चौथे वर्ष 2013 चे
  •  बीएचएमएस - चौथे वर्ष जुना अभ्यासक्रम, चौथे वर्ष नवीन अभ्यासक्रम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dates of medical degree examination declared, lets know the dates