लॉकडाऊनवर भाष्य करणाऱ्या 'उठेंगे हम' चित्रफितीचा डिजिटल प्रीमियर

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 6 June 2020

कोरोनाचे संकट आपल्या देशावर घोंघावत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे अचानक आपल्या देशातील 130 कोटी लोकांना घरातच थांबावे लागले.

मुंबई : कोरोनाचे संकट आपल्या देशावर घोंघावत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे अचानक आपल्या देशातील 130 कोटी लोकांना घरातच थांबावे लागले. देशातील सगळे व्यवहार अचानक थांबले. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. अख्खा देश स्तब्ध होऊन सुन्न झाला. 

वाचा ः अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

परंतु यातूनही आपण सगळे बाहेर पडू. एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या मदतीने पुन्हा उभे राहू... फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा मोठी झेप घेऊ...अशा प्रकारचा संदेश देणारी 'उठेंगे हम' ही चित्रफीत दिग्दर्शक भारत बाला यांनी बनविली आहे. आज त्या चित्रफितीचा डिजिटली प्रीमियर झाला. भारत बाला हे तमीळ दिग्दर्शक आहेत. संगीतकार ए. आर. रेहमान यांचा वंदे मातरम हा म्युझिक व्हिडीओ आणि भारतीय सैन्यावर सियाचीन येथे चित्रित झालेले जन गण मन हे सगळ्यांनी चित्रपटगृहात पाहिलेले आहे. त्यातून भारत बाला यांचे कौशल्य दिसलेले आहे. 

वाचा ः आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर

आता त्यांनी कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांची स्थिती काय झाली आहे...या टाळेबंदीत लोकांनी जीवन कसे व्यतीत केले असेल... अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत लोकांची अवस्था काय होती..या सगळ्यांचे चित्रण 'उठेंगे हम' या चित्रफितीत आहे. भारत बाला आणि त्यांच्या टीमने कोरोनाचे युद्ध ऐन भरात असताना देशभरात ड्रोनच्या साह्याने चित्रीकरणासाठी परवानगी मिळविण्याचे दिव्य अंगावर घेतले. त्यांची टीम देशातील विविध भागांमध्ये हे काम करीत होती. भारत बाला मुंबईत होते आणि ते आपल्या स्मार्टफोनवरून दिग्दर्शन करीत होते. अखेर हाती जमलेल्या शंभराहून अधिक तासांच्या चित्रीकरणातले काही क्षण निवडून  'उठेंगे हम ' ही चित्रफीत बनविण्यात आली आहे. चार मिनिटांची ही चित्रफीत आहे. 

वाचा ः बापरे! मुंबईतून गावी गेलेल्या स्थलांतरितांची उत्तर प्रदेशात दहशत; तब्बल 'इतके' जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह..

117 जणांच्या पंधरा टीमने हे चित्रण केले आहे. ही चित्रफित अनेक भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आली आहे. यामध्ये मराठी आवृत्तीही आली असून त्यासाठी सोनाली कुलकर्णी हिने आपला आवाज दिला आहे. कोरोनाने आपल्या अर्थव्यवस्थेची आणि मानसिक स्वास्थ्याची जी काही दैना उडवली आहे, त्यातून आपण सगळे बाहेर पडू आणि एकमेकांना हात देऊन बाहेर पडू; अशी आशा भारत बाला यांना वाटते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shortfilm uthenge hum premiered digitally to express on lockdown