कुर्ला येथे माता व नवजात अर्भकाचा मृत्यू

file photo
file photo

मुंबई : कुर्ला पश्‍चिममधील हबीब रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मातेसह नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील डॉक्‍टर शिफा खान यासाठी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कुर्ला पश्‍चिम येथील नवपाडा परिसरात राहणारे सुनील उपेंद्र दास यांची पत्नी नीलिमा सुनील दास (वय 31) हिला प्रसूतीसाठी 24 ऑक्‍टोबर 2019 रोजी हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या नीलिमा दास यांच्यावर प्रसूतीचे उपचार सुरू होते. 25 ऑक्‍टोबर 2019 रोजी झालेल्या प्रसूतीवेळी माता व पोटातील अर्भक नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले; मात्र प्रसूती झाल्यानंतर डॉक्‍टर शिफा खान यांनी नीलिमा दास यांना जन्मलेल्या मुलगीची हालचाल नसल्याचे सांगून तिला कुर्ला (पश्‍चिम) येथील हबीब हॉस्पिटलपासून जवळ असलेल्या शीतल चाईल्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले; तर माता नीलिमा दास यांना रक्तस्राव होत असल्याचे सांगून तिची शस्त्रक्रिया करावी लागेल व तिची गर्भपिशवी काढून टाकावी लागेल असे सांगण्यात आले; मात्र नीलिमा दास ही शुद्धीवर येत नसल्याने तिच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले.

अखेर नीलिमा दास यांचे ब्रेन हॅमरेज झाले असल्याचे सांगून ती कोमामध्ये गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर रात्री (ता. 29) रोजी नीलिमा दास यांचा मृत्यू झाला; तर तिच्या नवजात मुलीचा ब्रेन डेड झाल्याने 30 तारखेला मृत्यू झाला. 

याप्रकरणी मृत नीलिमा दास यांचे पती सुनील दास यांनी डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत विनोबा भावे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे; तर हबीब रुग्णालय अवैधपणे सुरू असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला आहे. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 
याप्रकरणी शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांना पत्र पाठवून सदर अवैध रुग्णालयावर कायदेशीर कारवाई न करणारे विनोबा भावे नगर पोलिस आणि एल विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या हलगर्जीपणामुळे हबीब रुग्णालयात मातेचा व नवजात अर्भकाच्या मृत्यूसंदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com