महापालिकेतील विरोधकांनाही लागलीय 'टक्केवारी'ची वाळवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

वाशी येथील कार्यक्रमात शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत आणि नगरसेवक रंगनाथ औटी यांच्यात काही विषयांवरून बाचाबाची झाली. यादरम्यान भगत यांनी औटी यांच्या कानशिलात लगावण्याचे वृत्त शहरभर पसरले.

नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे वास्तव नुकतेच उघड झाले आहे. शनिवारी (ता.13) वाशी येथे पारपत्र कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत झालेल्या वादामध्ये टक्केवारी प्रकरणच असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईतील समाजमाध्यमांत रंगली आहे. हा वाद आता पक्षांतर्गत पातळीवरही शिगेला पोचल्याचे सांगण्यात येते असून, आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी त्याला असल्याचीही चर्चा आहे. 

वाशी येथील कार्यक्रमात शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत आणि नगरसेवक रंगनाथ औटी यांच्यात काही विषयांवरून बाचाबाची झाली. यादरम्यान भगत यांनी औटी यांच्या कानशिलात लगावण्याचे वृत्त शहरभर पसरले. स्थायी समितीमधील टक्केवारीवरून हा वाद झाल्याचे वृत्त एका प्रसिद्धीमाध्यमाने प्रसारित केल्यानंतर टक्केवारीची चर्चा समाजमाध्यमांवर चांगलीच रंगली. मात्र आमच्यात फक्त बाचाबाची झाली. त्याचे स्थायी समितीवरील टक्केवारीशी काहीच संबंध नाही, असा खुलासा औटी यांनी केला आहे.

शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेची चर्चा रविवारपर्यंत समाजमाध्यमांवरील विविध राजकीय व सामाजिक ग्रुपमध्ये सुरू होती. अनेकांनी टक्केवारी फक्त सत्ताधारीच खात नाहीत, तर यात विरोधकांचाही तेवढाच वाटा असल्याची शेरेबाजी केली. स्थायी समितीमध्ये मंजूरीसाठी येणाऱ्या विकास कामांवर फक्त सत्ताधारीच कंत्राटदाराकडून पैसे उकळतात, असा आरोप केला जात होता. परंतु शिवसेनेतील नगरसेवकांच्या या वादामुळे टक्केवारीचे हे ग्रहण विरोधी पक्षालाही लागल्याचे अधोरेखीत झाले आहे. टक्केवारीच्या या राजकारणाचा शहराच्या विकास कामावर परीणाम होत आहे. टक्केवारीमुळे अनेक कामांचा दर्जा घसरत चालल्याने महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी देखील याआधी चिंता व्यक्त केली आहे. 

शिवसेनेच्या 18 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 
वाशीतील प्रकरणानंतर सदर नगरसेवकावर कारवाई करावी, या मागणीसाठी रंगनाथ औटी यांच्यासोबत नेरूळमधील शिवसेनेच्या 18 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक लेखी निवेदन लिहून सामुहिक राजीनामे दिले आहेत. औटी यांच्यासोबत नेरूळ-जुईनगरचे शिवसेनेचे नगरसेवक विशाल ससाणे यांच्या राजीनाम्याचा उल्लेखही या सामुहिक राजीनाम्याच्या पत्रात केला आहे. याबाबत नामदेव भगत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. लवकरच माध्यमांसमोर आपली बाजू स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले.

वाशीत पासपोर्ट कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणी औटी यांचा राजीनामा आला असला, तरी औटींची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढली आहे. त्यांनी भगत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करीत आहेत. 
- विठ्ठल मोरे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख, शिवसेना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate among opponents by a percentage of standing committee