ठाण्यातील राडारोडा महामार्गावर 

ठाणे : भिवंडी बायपास मार्गावर टाकण्यात आलेले डेब्रिज. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : भिवंडी बायपास मार्गावर टाकण्यात आलेले डेब्रिज. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत असल्याने नेहमीच स्थापत्यविषयक कामांची लगबग सुरू असते. यासह जुन्या इमारतींची किंबहुना अनधिकृत बांधकामांची तोडफोड, ही तर नित्याचीच बाब आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणारा राडारोडा आणि डेब्रिज कुठेही फेकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. 

ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने खाडी परिसरात व डम्पिंग ग्राऊंडवर स्थापत्य कचरा फेकण्यावर निर्बंध लादल्याने अनेक कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारा राडारोडा थेट महामार्गाच्या कडेला फेकत असल्याचे समोर आले आहे.

भिवंडी बायपास आणि पारसिकनगर दिशेकडील रस्त्याच्या दुतर्फा डेब्रिजचे ढीग दिसून येत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय, रस्त्यावर येणाऱ्या या ढिगांमुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना वाहने हाकणे जिकिरीचे बनत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

ठाण्यातून मार्गस्थ होणारा मुंबई-नाशिक महामार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहनांच्या गर्दीने व्यापलेला रस्ता असून, सतत या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरूच असते. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडे या महामार्गाची जबाबदारी असून वाहने वाढत असल्याने या मार्गाचे दुप्पट रुंदीकरण करण्याचे प्रयत्न सरकारदरबारी सुरू आहेत.

तरीही, सद्यस्थितीत या महामार्गावरील भिवंडी बायपास आणि पारसिकनगर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडा-झुडपांमध्ये रात्रीच्या वेळेत डेब्रिज भरलेले ट्रकच्या ट्रक राजरोसपणे रिते केले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. 

हा राडारोडा आता थेट रस्त्यावर येत असल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरून वाहनांच्या वेगावर मर्यादा येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. केवळ ठाण्यातीलच नव्हे; तर मुंबईतील राडारोडाही या ठिकाणी टाकला जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.

डेब्रिज, नाल्यातील चिखल आणि टाकाऊ घरसामान महामार्गावरील झाडाझुडपात फेकून दिल्याने रस्त्याकडेच्या वृक्षांच्या मुळावर हा राडारोडा येत आहे. महामार्गावरील वनराई बाधित होण्याबरोबरच धुळीमुळे या वृक्षांची रया निघून गेली आहे. तेव्हा, रस्ते विकास महामंडळासह वाहतूक विभाग आणि पोलिसांनी या अंदाधुंदीकडे लक्ष पुरवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. 

घातक रसायनेही रस्त्यावर 

  • मुंबई-नाशिक महामार्गावर राडारोड्यासह आता घातक रसायनांच्या शेकडो गोण्या फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. "पार्कन्स कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड कोसमिल सल्फर' असे लिहिलेल्या संसर्गजन्य कीटकनाशकाच्या पिशव्यांचे ढीग रचून ते रस्त्यालगत ठेवण्यात आले आहेत.
  • या पिशव्यांवर खतरा, लहान मुलांपासून दूर ठेवावे; त्याबरोबर खाद्यपदार्थ, पशूंचा आहार, पिण्याचे पाणी यांच्यापासून हे कीटकनाशक दूर ठेवावे, टाळे लावून बंदिस्त जागेमध्ये ठेवावे, डोळे आणि तोंडामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी; तसेच मासे आणि पशु-पक्ष्यांनाही याचा धोका आहे, असे स्पष्ट निर्देश या कीटकनाशकाच्या पिशव्यांवर लिहिलेले आहेत.
  • ठाण्याच्या दिशेने येताना दहा ते बारा ठिकाणी अशा गोण्यांचे ढिगारे असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तरीही याची दखल कुणीही घेतलेली दिसत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com