कचऱ्याचे विकेंद्रीकरण 425 कोटी वाचणार! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण केल्यास महापालिकेचे वार्षिक 425 कोटी रुपये वाचतील. त्याचबरोबर कचऱ्याच्या पुनर्वापरातून पालिकेला एक हजार 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या चर्चासत्रात काढण्यात आला. 

पालिका मुलुंड, कांजूरमार्ग आणि देवनारमध्ये कचरा टाकते. त्यातील फक्त कांजूरमार्गमध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या ठिकाणी कचरा वाहून आणणे आणि त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे मोठा खर्च येतो. कचरा उचलण्यापासून तो डंपिंग ग्राऊंडपर्यंत टाकण्यासाठी वर्षाला दोन हजार 250 कोटी रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात विभाग पातळीवर कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास खर्चात 425 कोटींची बचत होईल, असा निष्कर्ष चर्चासत्रात काढण्यात आला. प्रजा फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या चर्चासत्रात मुंबई विकास समिती आणि घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व मुंबईतील नगरसेवक सहभागी झाले होते. सर्वांनी कचऱ्याचे विक्रेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. 

सध्या कमी प्रमाणात कचऱ्याचा पुनर्वापर होतो; मात्र कचऱ्याची विल्हेवाट विभाग स्तरावर लावण्यात यश आल्याने त्याचा पुनर्वापर 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढू शकतो. त्यातून महापालिकेला एक हजार 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा अंदाजही चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. 

असे वाचतील पैसे (आकडे कोटीत) 
सध्याचा खर्च विक्रेंद्रीकरणानंतर होणारा खर्च 
प्रशासकीय 1625 1600 
वाहतूक खर्च 500 100 
देखभाल खर्च 125 125 

Web Title: Decentralization of waste will be 425 crores