घसरलेल्या टक्क्याचा उमेदवारांना धसका!

आगरी-कोळी भवनात मतपेट्या ठेवण्यात आल्या असून, मतमोजणीसाठी तयारी सुरू आहे
आगरी-कोळी भवनात मतपेट्या ठेवण्यात आल्या असून, मतमोजणीसाठी तयारी सुरू आहे

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे नवी मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीसहीत काँग्रेस-आघाडीच्या गटात चिंतात्मक शांतता पसरली आहे. दिवाळी सुट्टी, पश्‍चिम महाराष्ट्रातील स्थलांतर, पावसाची शक्‍यता आदी विविध कारणांमुळे सोमवारी (ता. २१) मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे उमेदवारांच्या विजयाची गणिते बिघडली आहेत; परंतु निकालानंतर मतदानाच्या दिवशी दगाफटका केल्याचे परिणाम स्पष्ट होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती; तर बेलापूर मतदार संघात ४९ टक्के मतदानाची नोंद झाली होती; परंतु त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी निरुत्साह दाखवल्यामुळे ऐरोलीत ४२.५१ टक्के; तर बेलापूरमध्ये ४५.१६ टक्के इतक्‍या मतदानाची नोंद झाली. उमेदवारांना अपेक्षित असलेल्या मतदानापेक्षा कमी प्रमाणात मतदान झाल्यामुळे निवडून येण्यासाठी आवश्‍यक मतांच्या गणितांचे समीकरण चुकले आहे. बेलापूरमध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात गणेश नाईकसमर्थक नगरसेवकांनी काही ठिकाणी बघ्याची भूमिका घेतली; तर निष्ठावंत कट्टर शिवसैनिक सोडल्यास शिवसेनेच्या उपऱ्या नगरसेवक आणि नेत्यांनी म्हात्रेंचे काम न करता बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे. उलट आघाडी व मनसेच्या उमेदवारांना उघड मदत केल्याचे दृश्‍य काही प्रभागात होते. महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेत माजलेली दुफळी शमवण्यास नेतेमंडळींना अपयश आल्याचे पुन्हा दिसून आले. कमी मतदानाची नोंद झाल्यामुळे ‘अबकी बार, एक लाख पार’ काहीसा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

विजयाची शंभर टक्के खात्री आहे. गेली पाच वर्षे केलेल्या विकासाची पोचपावती मला मिळणार आहे. मतदान केल्याबद्दल सर्वांचे आभार.
- मंदा म्हात्रे, बेलापूर, भाजप-शिवसेना महायुती.

विजयाची पूर्णपणे खात्री आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणस्थ मतदार पाठीशी राहिला. मतदान केल्याबद्दल सर्वांचे आभार.
-अशोक गावडे, उमेदवार, बेलापूर (राष्ट्रवादी काँग्रेस).

ऐरोली मतदारसंघ 
एकूण मतदान : १ लाख ९६ हजार १२८
पुरुष- १ लाख १२ हजार २१२ 
स्त्री- ८३ हजार ४१० 
एकूण - ४२.५१ टक्के 

बेलापूर मतदारसंघ 
एकूण मतदान : १ लाख ७४ हजार २८३ 
पुरुष - ९६ हजार ६६८ 
स्त्री - ७७ हजार ६१५ 
एकूण - ४५.१६ टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com