देहरंग धरणाच्या जलधारण क्षमतेत घट

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

वाहून आलेला गाळ काढण्यात जिल्‍हा प्रशासनाला अपयश

नवीन पनवेल : पनवेल पालिकेच्या देहरंग धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच जलाशय कोरडा पडतो. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे माथेरानच्या डोंगररांगातून वाहून आलेला गाळ देहरंग धरणात साठला आहे. त्यामुळे धरणातील पाणी गढूळ झाले असून, धरणाची पाणी साठवणूक क्षमतेतही घट होत आहे. 

या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. येथूनच दररोज जून ते मार्च दरम्यान सुमारे १५ एमएलडी पाणी घेतले जाते. इतकेच पाणी पालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेऊन शहराची तहान भागवावी लागते. २००५ ला आलेल्या महाप्रलयात देहरंग धरणामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगराची माती वाहून आली. त्यामुळे साहजिकच या जलाशयाची जलधारण क्षमता कमी झाली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी अनेक अडचणी येत आहेत. येथून दररोज पाणी घेतल्यास फेब्रुवारी महिन्यातच जलसाठा संपतो. गेल्या एक-दोन वर्षांपासून पालिका दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करून देहरंगमध्ये आणीबाणीसाठी जलसाठा करून ठेवत आहे. धरणातील गाळ काढून पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे जलसंपदामंत्री असताना येथील गाळ काढण्यासाठी यंत्रणा पुरवण्यात आल्या होत्या; मात्र नगरपालिकेला त्यांना पुरेसे इंधन पुरवता आले नाही. त्यामुळे आतमधील गाळ निघू शकला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी पुढाकार घेऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून काही प्रमाणात गाळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून फारसा फायदा झाला नाही. 

 २६ जुलै २००५ पेक्षाही यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. यावर्षी धरणाची जलधारण क्षमता १५ ते २० टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. त्यामुळे पालिकेने धरणातील गाळ काढून धरणाची जलधारण क्षमता वाढवली पाहिजे. जेणेकरून पनवेलकरांचा पाणीप्रश्न थोडाफार प्रमाणात का होईना मिटेल.
- संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in hydro capacity of Dehrang dam