बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

नेरूळ भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर महिलेचे अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्याद्वारे अश्‍लील मजकूर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : नेरूळ भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर महिलेचे अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्याद्वारे अश्‍लील मजकूर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पीडित महिलेच्या पतीने व तिच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या पत्नीने केल्याचा संशय पीडित महिलेने व्यक्त केला आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

ही बातमी वाचली का? तिला वाचवता वाचवता तोच जळाला

या प्रकरणातील 30 वर्षीय तक्रारदार महिला नेरूळमध्ये राहण्यास असून ती एन्व्हॉयर्न्मेंट इंजिनिअर या पदावर काम करीत आहे. गेल्या महिन्यामध्ये या महिलेचे अज्ञात व्यक्तीने बनवाट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर पीडित महिला शरीरसंबंधासाठी तयार असल्याचा मजकूर टाकला होता. तसेच संपर्कासाठी पीडित महिलेच्या आईचा मोबाईल नंबर देऊन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. 

ही बातमी वाचली का? उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज 

हा प्रकार पीडित महिलेच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरील मैत्रिणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने याबाबतची माहिती पीडति महिलेला दिली होती. हा प्रकार आपल्या पतीने व आपल्या कामावरील सहकाऱ्याच्या पत्नीने केल्याचा संशय पीडित महिलेने व्यक्त केला. तसेच याबाबतची लेखी तक्रार नेरूळ पोलिस ठाण्यात केली होती. तसेच नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडेदेखील ऑनलाईन तक्रार केली होती. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी या प्रकरणात पीडत महिलेचा पती व कामातील सहकाऱ्याची पत्नी या दोघांवर आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defamation of a woman through a fake Facebook account