पराभूतांची अस्तित्वासाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सत्तेची सतत चव चाखणाऱ्यांना सत्तेविना बेचैनी आल्याने त्यांनी पद मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे...

ठाणे - तब्बल दोन ते तीन निवडणुकांमध्ये एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आताच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या दिग्गज उमेदवारांची आता राजकीय पुनर्वसनासाठी धडपड सुरू केली आहे. अनेक वर्ष अपयश काय असते हे माहीत नसलेल्या या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांना आता अपयश पचवणे कठीण झाले आहे. अशा उमेदवारांनी पुनर्वसनासाठी पक्षविरोधी कारवायांचा देखावाही सुरु केला आहे. स्वीकृत नगरसेवक, परिवहन, शिक्षणसमिती, वृक्षसमिती, महिला व बाल कल्याण अशा एखाद्या महत्त्वाच्या पदावर जाण्यासाठी शक्‍य तितका आटापिटा सुरू झाला आहे. पद मिळण्याची धडपड अपयशी ठरत असल्याचे दिसताच काहींनी थेट पक्षाविरोधात भूमिका घेऊन ‘आम्हाला काहीतरी द्याच’ असे सांगायला सुरुवात केल्याची माहिती आहे. प्रत्येक पक्षाकडून अशा पराभूतांच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय घेण्यात येणार असला, तरी मतदारांनी नाकारल्यानंतर या मंडळींची पक्षातील किंमत नक्कीच कमी झालेली दिसत आहे.

ठाण्यात अनेक जुन्या चेहऱ्यांना पालिकेत स्थान मिळाले असले. तरी अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. माजी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, ज्येष्ठ नगरसेवक, तीन ते चार वेळा निवडून येणारे अनेक नगरसेवक यात आहेत. यापैकी अनेकांना अपशय जिव्हारी लागले आहे. अपयश मिळाल्यापासून या मंडळींनी परिसरातील सार्वजनिक कामांमधील आपला सहभाग कमी केला आहे. सत्तेची कवचकुंडले काढून घेतल्याने त्यांना निष्क्रियता सतावत आहे. सत्ता नसल्याने उद्विग्न झालेली ही मंडळी प्रत्येकाकडे संशयाने पाहू लागली आहेत. काही महिला ज्येष्ठ नगरसेविकांना यामुळे हतबलता आली आहे. पालिकेत महिला महापौरांचे आरक्षण असल्यामुळे अशा ज्येष्ठ नगरसेविकांनी तर महापौर पदावर दावा सांगण्याची तयारीही केली होती; मात्र मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यामुळे या मंडळींची अवस्था गंभीर बनली आहे.

पदाची अभिलाषा
सत्तेत असताना महत्त्वाची पदे भूषवल्यामुळे सत्तेपासून दूर राहिल्याचा धक्का या मंडळींना सहन होत नाही. अद्याप महापालिका महापौरांच्या निवडणुकीबाबत हालचाल झाली नसली, तरी पराभूत उमेदवार पुनर्वसनासाठी धावाधाव करत आहेत. आम्ही हरलो असलो तरी आम्हाला राजकीय पद द्या, म्हणजे आमच्या प्रभागातील मंडळींची कामे करता येतील, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, वर्तकनगर, कोपरी, दिवा या सगळ्या भागांमधील उमेदवारांमध्ये ही घालमेल असून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही चलबिचल सुरू आहे. पालिकेचे नाही किमान पक्षाचे तरी मोठे पद द्या, अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: Defeated candidate the struggle for existence