esakal | ‘मिनरल्‍स’च्या नावाखाली अशुद्ध धंदा!
sakal

बोलून बातमी शोधा

‘मिनरल्‍स’च्या नावाखाली अशुद्ध धंदा!

पनवेलची भूजल पातळी खालावली; बाटलीबंद दूषित पाण्याची विक्री तेजीत

‘मिनरल्‍स’च्या नावाखाली अशुद्ध धंदा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पालिकेमार्फत प्रदूषणाच्या सद्यस्थितीबाबत तयार करण्यात आलेल्या अहवालात प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील भूजल पातळीत सर्वात जास्त प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भूजल प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या स्थानावर असलेल्या या प्रभागातील तोंडरे गावात जवळपास ६ कंपन्यांमार्फत शुद्ध पाण्याच्या नावावर भूगर्भातून उपसा करण्यात येत असलेले पाणी बाटलीबंद करून विकण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

हे वाचा :  आकाशातही ‘ही’ जोडी ठरली हिट

खासगी जमिनीवर सुरू असलेल्या या घातक व्यवसायाविरोधात कोणत्या विभागाने कारवाई करायची याबाबत पालिका प्रशासन; तसेच तहसील विभाग एकमेकांकडे बोट 
दाखवत आहेत.

पालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तोंडरे गावालगत असलेल्या परिसरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या जवळपास ६ कंपन्या विंधन विहिरींमार्फत भूगर्भातील पाण्याचा उपसा करून बाटलीबंद पाणीविक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत. कंपन्यांमार्फत खोदण्यात आलेल्या विंधन विहिरींमुळे परिसरातील जलपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने ऐन उन्हाळ्यात परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पालिकेमार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदूषणाच्या सद्यस्थितीमधील अहवालात औद्योगिक क्षेत्रालगतच्या या परिसरातील भूजल पातळी सर्वात जास्त प्रदूषित असल्याचा ठपका ठेवत प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हे वाचा :  हापूसप्रेमींनो हे वाचाच 

परिसरात सुरू असलेल्या कारखान्यांकडून पाणी शुद्ध करण्याकरिता कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवण्यात येते, हा प्रश्न अनुत्तरित आहे. योग्य रीतीने पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणारा पाणीपुरवठा करण्याबात कोणत्या विभागाला जवाबदार धरायचे, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 
तोंडरे गावातील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील यांनी आतापर्यंत अन्न आणि औषध प्रशासन, पालिका आयुक्त, पनवेल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर पालिकेमार्फत  बोअरवेल कायमस्वरूपी बंद करण्याची विनंती प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी केली आहे.

खासगी जागेत असलेल्या बोअरवेलमधील पाण्याचा वापर कोणी कशासाठी करावा, याबाबतचे निकष पालिकेचे पाणीपुरवठा विभाग ठरवू 
शकत नाहीत. 
- उल्हास वाड, अधिकारी पाणी पुरवठा विभाग, पालिका. 

प्रदूषणाबाबत ज्या विभागातील घटकांवर ठपका ठेवण्यात आला असेल, त्या विभागाला पत्र पाठवून  कारवाई करण्याचे आदेश पुढील महिन्यात देण्यात येणार आहेत. -
 तेजस्विनी गलांडे, सहाय्यक उपायुक्त, पालिका

loading image
go to top