बुद्ध विहारासाठी तेरा वर्षांत दमडीही नाही - टेक्‍सास गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

देहूरोड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंटमधील बुद्ध विहाराचा क वर्ग पर्यटनस्थळात 2004 मध्ये समावेश केला. चार कोटी 19 लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र, गेल्या 13 वर्षांत एक दमडीही मिळाली नाही, अशी टीका बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्‍सास गायकवाड यांनी केली.

देहूरोड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंटमधील बुद्ध विहाराचा क वर्ग पर्यटनस्थळात 2004 मध्ये समावेश केला. चार कोटी 19 लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र, गेल्या 13 वर्षांत एक दमडीही मिळाली नाही, अशी टीका बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्‍सास गायकवाड यांनी केली.

राज्याचे समाजकल्याणमंत्री, मावळचे आमदार आणि पालकमंत्री यांनीही विहाराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली. मात्र, यापैकीही निधी मिळालेला नाही. अखेर देहूरोड परिसरातील बांधवांच्या धम्मदानातून विहाराचे बांधकाम सुरू केल्याची माहिती त्यांनी -----------सोमवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत दिली. बुद्धविहाराच्या 63 व्या वर्धापन दिनामिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, 'अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे बुद्धविहारास क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. चार कोटी 19 लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्ष खर्चाची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, दरम्यानच्या काळात विहाराच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी अडीच कोटी, पालकमंत्री गिरीश बापट यांनी 25 लाख, तर आमदार संजय भेगडे यांनी त्यांच्या कार्यअहवालात विहारासाठी अडीच कोटी खर्च नमूद केला. मात्र, हा निधी मिळालेला नाही. धम्मदानातून विहाराचे बांधकाम सुरू केले आहे. तीन महिन्यांपासून ते सुरू असून आजपर्यंत मूळ विहारावरील पुनर्बांधकाम आणि फाउंडेशनचे काम झाले. त्यासाठी 35 लाखांचा खर्च आला, असे टेक्‍सास गायकवाड आणि अशोक गायकवाड यांनी सांगितले. या वेळी विश्वस्त समितीचे ऍड. गुलाब चोपडे, धर्मपाल तंतरपाळे, मंदाकिनी भोसले, संगीता वाघमारे, बापू गायकवाड, विजय पवार, महेश गायकवाड उपस्थित होते. विहाराच्या रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

वर्धापन दिनाचे कार्यक्रम
सकाळी आठला संघपाल सिरसाट व विदर्भातील भीमसैनिकांची धम्मयात्रा, साडेआठला नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, नऊला बुद्धवंदनेनंतर धम्मभूमी बौद्धाचार्य विजय गायकवाड मार्गदर्शन करतील. दुपारी 12 वाजता डी. एस. नरसिंगे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग धम्मपरिषदेचे उद्‌घाटन भन्ते ज्ञानज्योती करतील. प्रमुख वक्ते म्हणून जी. एस. दादा कांबळे, राहुल गायकवाड, विष्णू कासारे, सुदाम पाटोळे, शाहू रणदिवे लाभणार आहेत. धम्मभूमीचे अनुवर्तक सयाजी गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.

डॉ. नितीन राऊत यांना बुद्धरत्न पुरस्कार
यंदाचा बुद्धरत्न पुरस्कार माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांना जाहीर झाला आहे. तसेच, सत्यशोधक डी. एस. नरसिंगे (धम्मरत्न पुरस्कार), बडोदा संकल्प भूमीचे मितेश एस. परमार (क्रांतिरत्न), बंगळुरूस्थित आंबेडकर व्हाइसचे संपादक के. चंद्रशेखर (साहित्यरत्न), शिक्षक नेते अंबादास शिंदे (भीमरत्न) आणि अविचल धिवार (उद्योगरत्न) यांना गौरविण्यात येणार आहे, असे टेक्‍सास गायकवाड, ऍड. गुलाब चोपडे यांनी सांगितले.

देहूरोड - बुद्धविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेली रंगरंगोटी.

Web Title: dehuroad pune news no money for buddha vihar in 13 years