मनोर येथील कलाशिक्षकांच्या बांबूच्या आकाशकंदिलाला देशभरात मागणी

नविद शेख
Wednesday, 28 October 2020

सावरे परिसरातील शाळा सजावट, शाळा रंगवणे, कार्टून काढणे आदी कामे करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात बांबूपासून पेपर वेट, इमारतीची आणि घराची प्रतिकृती असे भेट देण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे त्यांचे काम सुरू होते. 

मनोर : आदिवासीबहुल दुर्गम भागातील एका आदिवासी कला शिक्षकाच्या हस्तकलेची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याने बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांना संपूर्ण महाराष्ट्र, तसेच परदेशातून मागणी वाढली आहे. अडीच महिन्यांपूर्वी मोजकेच आकाशकंदील तयार करून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत विक्री करण्याचा उद्देश बाळगून कामाला लागलेल्या विनोद वनगा यांच्या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सावरे एम्बुर ग्रामपंचायत हद्दीतील सासे पाड्याचे नाव बांबूच्या आकाशकंदिलांमुळे महाराष्ट्रात पोहोचले आहे. 

महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती

वसई विकासिनी संस्थेत कलाशिक्षण घेणाऱ्या विनोद वनगा यांनी दुर्वेसच्या जिल्हा परिषद शाळेत काही वर्षे अंशकालीन कलाशिक्षक पदाची नोकरी केली आहे; परंतु हातातील कला साद देत असल्याने त्यांनी सावरे परिसरातील शाळा सजावट, शाळा रंगवणे, कार्टून काढणे आदी कामे करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात बांबूपासून पेपर वेट, इमारतीची आणि घराची प्रतिकृती असे भेट देण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे त्यांचे काम सुरू होते. 

अधिक वाचा : तुला थोबडवणार...मराठीची चिड येते म्हणणाऱ्या कुमार सानूच्या मुलाला मनसेचा इशारा

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या रोजगारावर झाला. त्यामुळे दिवाळीनिमित्त बांबूपासून आकाशकंदील तयार करून आपल्या गावातच त्यांची विक्री करण्याचा विचार विनोद वनगा यांनी केला. त्यानंतर बाराशे रुपयांच्या गुंतवणुकीतून वनगा यांनी शेतातील घरात कामाला सुरुवात केली. महिनाभरात दोन कामगारांच्या साह्याने बारा प्रकारचे दोनशे आकाशकंदील त्यांनी तयार केले; परंतु समस्या होती ती विक्रीची. यावर उपाय म्हणून वनगा आणि त्यांच्या मित्रांनी आकाशकंदिलांचे फोटो त्यांच्या किमतीसह सावरे टोकर कला केंद्राच्या नावाने गावातील व्हॉट्‌सऍप ग्रुप आणि फेसबुक शेअर केले होते. हे फोटो समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यानंतर मागणीत वाढली. लोक आकाशकंदील खरेदीसाठी सासे पाड्यातील टोकर कला केंद्राचा शोध घेत येऊ लागले. मागणी वाढल्याने कला केंद्रातील कामगारांची संख्या वाढली असून आजमितीला वीस कामगार आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत. बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदिलांचा उत्तम दर्जा, टिकाऊपणा आणि माफक किमतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली. हाताने तयार होत असल्याने दिवसभरात फक्त पंधरा आकाशकंदील तयार होतात. नोव्हेंबर महिन्याच्या बारा तारखेपर्यंत ऑर्डर बुक झाली आहे. हस्तकलेला मिळालेल्या प्रतिसादामुळे वनगा यांचा हुरूप वाढला आहे. 

 

शोभिवंत वस्तू निर्मिती -

दिवाळीनंतर बांबूपासून पेपर वेट, फोटो फ्रेम, वॉल सिलिंग, फुलदाणी, क्रिकेटचे चषक आणि शोभिवंत वस्तू तयार करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारली पेंटिंग पासून प्रेरणा घेत आदिवासी कला आणि संस्कृती आकाशकंदील आणि इतर वस्तूंमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. 

(संपादन : वैभव गाटे)

Demand for bamboo sky lanterns by art teachers at Manor across the country


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for bamboo sky lanterns by art teachers at Manor across the country