कृषी क्षेत्रातील पदवीला व्यावसायिक अभ्याक्रमाच्या दर्जाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

कृषी व्यवसाय व्यवस्थापन या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी. 

राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील व्यावसायिक संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. राज्यात चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेल्या 12 खाजगी महाविद्यालयामध्ये सन-2003 सालापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा अभ्यासक्रम BSc (Agriculture Management), BBM (Agriculture), BBA (Agricultural), BSc (Hons. Agriculture Business Management) या नावाने शिकवले जात आहे. परंतू सततच्या या पदवीच्या नामकरणामुळे शासनाच्या काही स्पर्धा परीक्षेसाठी पात्रता ग्राह्य न धरल्या जाणे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळणे किंवा अडकून राहणे, तसेच पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कृषी सेवा केंद्राचा परवाना न मिळणे अशा अडचणींना सामोरे जावं लागत आहे. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी या पदवीच्या अभ्यासक्रमाचा दर्जा म्हणून मान्यता देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

या मागणी संदर्भात कृषी व्यवस्थापनच्या विद्यार्थी शिष्ट मंडळाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडे मदत मागितली असता ता. 22 जून ला शरद पवार यांची भेट घेऊन हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand for a professional curriculum degree in agricultural sector by students