भाजीपाल्याच्या गाड्या कल्याण-डोंबिवली पालिकेला डोईजड! योग्य नियोजन करण्याची कर्मचाऱ्यांचीच मागणी

शर्मिला वाळुंज :  सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

पुरेसे मनुष्यबळ नसल्याने याचे नियोजन वेगळ्यापद्धतीने करावे अथवा हा उपक्रमच बंद करावा अशी मागणी पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

ठाणे - भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बाजार शहरातील विविध मैदानांवर विभागला आहे. परंतू कल्याणमध्ये प्रवेश मिळत नसल्याने गावाकडील बहुसंख्य भाजीपालाच्या गाड्या डोंबिवलीतील क्रिडासंकुलात दाखल होत असून या गाड्यांचे नियोजन करणे प्रशासनाला डोईजड होऊ लागले आहे. क्षमतेपेक्षा जास्त गाड्या या परिसरात दाखल होत असून केवळ विक्रेते नाही तर स्थानिक नागरिकही भाजी खरेदीसाठी येथे गर्दी करतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने याचे नियोजन वेगळ्यापद्धतीने करावे अथवा हा उपक्रमच बंद करावा अशी मागणी पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Lockdown : अंध व्यक्तीचे गृहस्वप्न पूर्ण होणार? न्यायालयाचा दिलासा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष्मी मार्केटमधील भाजी बाजार कल्याणमधील 5 व डोंबिवलीतील  4 मैदानांत विभागण्यात आला आहे. कल्याणमधील मार्केटमध्ये केवळ 50 गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून त्यांना पास देण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे इतर गाड्यांना तेथे प्रवेश मिळत नाही. लॉकडाऊन काळात गावाकडील भाजीविक्रेते मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीच्या दिशेने येत आहेत. यात कल्याणमध्ये प्रवेश न मिळालेले डोंबिवलीतील क्रिडासंकुल हे ठिकाण जवळ पडत असल्याने तेथेच दाखल होत आहेत. डोंबिवलीतील भागशाळा मैदान, डि.एन.सी. मैदान व प्रिमियर मैदान येथे भाजीच्या गाड्या कमी प्रमाणात जात असून क्रिडासंकुलात दाखल होत असल्याने येथे नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. क्रिडासंकुलात होणारी भाजीपाल्याच्या गाड्यांचे नियोजन करण्याकरीता या मैदानात 90 गाळे पालिका प्रशासनाने बांधले आहेत. या गाळ्यांमध्ये विक्रेत्यांना जागा देऊन त्यांच्याकडून शहरातील किरकोळ विक्रेतेच माल खरेदी करतील असा आदेश असतानाही त्या आदेशाला मात्र नागरिक आणि विक्रेते कात्री लावत आहेत.

पुरुषी अहंकार, पुरुषत्वाशी जोडलेल्या लैंगिक भावना आणि इंटरनेटच्या माध्यमातून उघडकीस आलेले सनसनी चॅट्स..​

50 च्यावर गाड्या या संकुलात दररोज दाखल होत असून कोणाला प्राधान्य द्यावे हा पेच येथील कर्मचाऱ्यांना दररोज पडतो. प्रथमतः शहरातील होलसेल विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा आमचा मानस होता, परंतू गावातील शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आता प्रथम येणाऱ्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. परंतू त्यातही विक्रेत्यांची वादावादी होत आहे. भाजीपाल्याच्या ट्रकमधूनच किरकोळ विक्रेत्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा होलसेल विक्रेत्यांची येथे सुरु होते. केवळ विक्रेत्यांना येथे प्रवेश असताना स्थानिक नागरिकही दादागिरी करुन येथे भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. पालिका प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने यासर्व गोष्टींना आळा घालणे दिवसेंदिवस कठिण होत चालले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

VIDEO: उल्हासनदी एवढी स्वच्छ कधी पाहिली होती का? मासेमारही झाले खुश

पालिका प्रशासनाने हा एक चांगला उपक्रम आखला होता, परंतू नागरिक, भाजी विक्रेत्यांची होणारी गर्दी पहाता हा उद्देश सफल होत असल्याचे लक्षात येत नाही. यासाठी एकतर येथे येणाऱ्या गाड्यांना पास द्यावेत जेणेकरुन दुसऱ्यांना प्रवेश देता येणार नाही. 50 - 50 गाड्या सर्व मैदानावर दाखल होतील असे नियोजन करण्यात यावे म्हणजे एका मैदानावर भार येणार नाही. शिवाय गर्दीचेही विभाजन होईल अशी आखणी करायला हवी तरच उद्देश सफल होईल अन्यथा नाही.

डोंबिवलीतील क्रिडासंकुलात भाजीपाल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दाखल
होत आहेत. इतर मैदानावर भाजीविक्रेते जाण्यास तयार होत नाही. संकुलात प्रवेश न मिळाल्यास विक्रेते बाहेरील रस्त्यावर मालाची विक्री करतात मग त्यांच्याकडून स्थानिक नागरिक काही विक्रेते माल खरेदी करतात. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतू मनुष्यबळ कमी पडत आहे. आयुक्तांसोबत नियोजनात बदल करण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. पास धारक गाड्यांना प्रवेश तसेच योग्य विभाजन केल्यास प्रत्येक मैदानावर गाड्या दाखल होतील याविषयी बोलणार आहोत. 
राजेश सावंत, फ प्रभागक्षेत्र अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for proper planning of Vegetable carts to municipality!