वेदरशेडवरील कारवाई थांबवण्याची मंदा म्हात्रेंची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पावसाळ्यात हॉटेलचालकांचे नुकसान होऊ नये, म्हणून पालिकेने वेदरशेडवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मिसाळ यांच्याकडे केली; मात्र हॉटेल व्यवसायिकांना शिस्त लावण्यासाठी मिसाळ यांनी सुरू केलेली कारवाई ते थांबवतील का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : बेकायदा वेदरशेड उभारणाऱ्या शहरातील हॉटेलचालकांवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सुरू केलेल्या कारवाईला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंनी विरोध केला आहे. पावासाळा सुरू असल्यामुळे व्यावसायिकांनी तात्पुरत्या शेड उभारल्या आहेत. पावसाळ्यात हॉटेलचालकांचे नुकसान होऊ नये, म्हणून पालिकेने वेदरशेडवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मिसाळ यांच्याकडे केली; मात्र हॉटेल व्यवसायिकांना शिस्त लावण्यासाठी मिसाळ यांनी सुरू केलेली कारवाई ते थांबवतील का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मिसाळ यांच्या आदेशानुसार विभाग कार्यालयातून बेलापूर, नेरूळ आणि वाशी या भागातील विविध हॉटेलचालकांना बेकायदा वेदरशेडच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; तर तुर्भेतील हॉटेलचालकांना नोटीस वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. 

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही पहिल्यांदा शहरातील हॉटेलचालकांनी व रहिवाशी इमारतींवर नागरिकांनी उभारलेल्या बेकायदा वेदरशेडवर कारवाई करून आपला दणका दाखवण्यास सुरुवात केली होती; परंतु त्या वेळीही मंदा म्हात्रे हॉटेलचालकांच्या बाजूने धावून आल्या होत्या. मुंढे ऐकत नसल्याने म्हात्रेंनी खुद्द राज्य सरकारचा दबाव आणून अखेर ही कारवाई थांबवली होती. आता मिसाळ महापालिकेत आल्यानंतर पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याने म्हात्रे यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demands for slowing down action on WeatherShed