'आम्हाला तीन वर्षांसाठी तुकाराम मुंढे द्या..!'

दिनेश गोगी
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

1996 साली नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून उल्हासनगरात तब्बल 40 आयुक्तांनी पदभार हाताळला आहे. त्यापैकी 20 आयएएस अधिकारी हे आयुक्तपदी येऊन गेले आहेत.

उल्हासनगर : विद्यमान आयुक्त अच्युत हांगे हे तीन चार महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी करतानाच रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त या महत्वाच्या पदांवर राजपत्रित अधिकारी नेमण्याची शिफारस वणवा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष निलेश पवार यांनी मुख्यमंत्री,नगरविकास विभागाकडे केली आहे.

1996 साली नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून उल्हासनगरात तब्बल 40 आयुक्तांनी पदभार हाताळला आहे. त्यापैकी 20 आयएएस अधिकारी हे आयुक्तपदी येऊन गेले आहेत. त्यात एकमेव एक बी.आर.पोखरकर यांचा सुमारे सव्वादोन वर्षाचा अखंड कालावधी वगळता दुर्दैवाने उर्वरित आयुक्तांची कारकीर्द आलटून पालटून काही महिने ठरली आहे.

त्याचे उदाहरण एस. एच. शुळ, आर. डी. शिंदे, सदाशिव कांबळे, राजेंद्र निंबाळकर, गणेश पाटील असून शिंदे यांनी चारदा शुळ यांनी तीनदा व कांबळे, निंबाळकर, पाटील यांनी दोनदा असे काही महिन्यांचे आयुक्तपद हाताळले आहे.

त्यात ई. रविंद्रन, गोविंद बोडके हे तर काही दिवसांचेच पाहुणे ठरले आहेत. यावर देखील निलेश पवार यांनी लक्ष वेधले आहे. काही महिन्यांच्या-दिवसांच्या आयुक्तपदाचा सारीपाट थांबवून उल्हासनगरचा विकासक चेहरामोहरा बदलण्यासाठी तुकाराम मुंडे यांना किमान तीन वर्षांसाठीची संधी द्यावी असे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विजया कंठे या मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या आहेत. तेंव्हापासून हे पद रिक्तच आहे. याशिवाय प्रतिनियुक्तीवरील अधिकारी प्रबोधन मवाडे,बालाजी लोंढे यांचीदेखील मागच्या वर्षी बदली झाली असून त्यांच्या जागी अद्यापही प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवलेला नाही.

या जागांवर राजपत्रित अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. सलग तीन वर्ष आयएएस दर्जाचा तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पाठवण्यात येत नसल्याने उल्हासनगरचा कारभार सैरभैर असल्याचा आरोपदेखील निलेश पवार यांनी केला आहे.

Web Title: Demnad for appointment of Tukaram Mundhe as Commissioner of Ulhasnagar