esakal | वाढदिवस साजरा करणार नाही; फडणवीसांनंतर अजितदादांचाही निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar-Devendra-Fadnavis

वाढदिवस साजरा करणार नाही; फडणवीसांनंतर अजितदादांचाही निर्णय

sakal_logo
By
विराज भागवत

देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघांचाही एकाच दिवशी असतो वाढदिवस

मुंबई: राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग (hoarding), बॅनर (banner) लाऊ नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सकाळी त्यांनी याबद्दलची माहिती दिल्यानंतर दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रभाव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस २२ जुलैलाच असतो.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाची जाहीरातबाजी नको, भाजपाकडून आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा येत्या गुरुवारी (२२ जुलै) वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी व त्यामुळे वाढणारा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO व्हायरल

कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. गर्दी जमवू नये. प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे. पुष्पगुच्छ पाठवू नयेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

loading image