एसटी महामंडळाच्या मुख्यालयाचा लवकरच कायापालट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाचा लवकरच कायापालट होणार आहे.

मुंबई: मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाचा लवकरच कायापालट होणार आहे. 1.8 हेक्‍टरवर पसरलेल्या या जागेवरील नव्या 49 मजली इमारतीसाठी तब्बल 469 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय एसटीचे बसस्थानकही येथेच असेल. 

एसटी महामंडळाच्या मुख्यालयाची इमारत 1964-65 मध्ये बांधण्यात आली. त्यामुळे या इमारतीची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्विकास करणे गरजेचे होते. आता महामंडळाची सध्याची ही इमारत पाडून, तेथे नव्या इमारतीची बांधणी करण्यात येणार आहे. बसआगाराचे अत्याधुनिकीकरण, कार्यशाळा याशिवाय इमारतीचे पहिले आठ मजले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार आणि बस पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. भविष्यात या एसटी बसआगारापासून जवळच मेट्रोचे स्टेशन होणार आहे. तसेच येथून जवळच उपनगरी रेल्वेस्थानकही आहे. अशा परिस्थितीत येथे येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टीने सर्व सुखसोई या इमारतीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

पुनर्विकासाच्या प्रस्तावानुसार 1.23 लाख चौ.फुटांवर ही इमारत बांधण्यात येणार आहे. 9 ते 14 मजल्यांवर एसटीच्या अधिकाऱ्यांची कार्यालये असतील; तर 15 ते 49 मजले एसटी वगळून इतर सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. त्यातून मिळणारा महसूल एसटी महामंडळाच्या नूतनीकरणासाठी वापरला जाईल, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एसटीला पार्किंगची समस्या भेडसावत असल्याने नव्या इमारतीच्या आरखड्यातच विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीचा आराखडा तयार आहे; मात्र अद्याप विकसकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. इमारतीसाठी लागणाऱ्या 469 कोटींची रक्कम उभे करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. इमारतीचे 15 ते 49 मजले भाडेतत्त्वावर दिल्यामुळे 29 महिन्यांतच ही रक्कम एसटीच्या तिजोरीत जमा होणार आहे. येथील जागेचे दर विचारात घेता, 16 कोटी रुपये दरमहा भाडेतत्त्वातून मिळू शकतात. 

प्रवाशांना विमानतळाचा अनुभव 
एसटी बसमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांना सध्याच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-2 टर्मिनलप्रमाणेच येथेही आरामदायी अनुभव मिळावा, असा प्रयत्न केला जाणार आहे. वातानुकूलित बसथांबा व प्रतीक्षा कक्ष, तळमजल्यावर कॅन्टीन सुविधा, वातानुकूलित आणि विना वातानुकूलित बससाठी वेगवेगळे पार्किंग आणि थांबे, सरकते जिने, काचेची तावदाने, पर्यावरणपूरक इमारती अशा पद्धतीने हा आराखडा बनवण्यात आला आहे. 

49 मजल्यांच्या इमारतीची रचना 
1 ते 8 मजले- वाहनतळ 
9 ते 14 मजले- एसटीची कार्यालये 
15 ते 49 मजले- भाडेतत्त्वाने वापर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: developing st stand in mumbai