नवी मुंबई महापालिकेतील 14 गावांचा विकास निवडणुकीशिवायही शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abhijit bangar

नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेशाची घोषणा झाली, मात्र त्याचा अध्यादेश निघाला नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 14 गावांना पालिकेच्या वेशी बाहेरच रहावे लागणार आहे.

नवी मुंबई महापालिकेतील 14 गावांचा विकास निवडणुकीशिवायही शक्य

डोंबिवली - नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेशाची घोषणा झाली, मात्र त्याचा अध्यादेश निघाला नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 14 गावांना पालिकेच्या वेशी बाहेरच रहावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आधीच तयार झाली असल्याने या गावांचा समावेश न करताच निवडणूका घेण्याची तयारी प्रशासनाने सध्यातरी केलेली आहे. यामुळे गावांचा पालिकेत समावेश होण्यास किती वेळ लागणार, येथे निवडणूका होणार की नाही? निवडणूका झाल्या नाही तर गावांचा विकास कसा होणार असे अनेक संभ्रम असल्याने बुधवारी कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील व 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.

यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेतले जातील, गावांचा अध्यादेश निघाला नसल्याने सध्याच्या निवडणूक रचनेत गावांचा समावेश नाही. मात्र गावांचा पालिकेत समावेश होताच विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे केली जातील असा विश्वास आयुक्त बांगर यांनी शिष्टमंडळास दिला. नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणुकीशिवाय गावांचा विकास शक्य असल्याचे विधान डोंबिवलीत केले असल्याने 14 गावातील ग्रामस्थांना सध्या तरी विकासाचा दिलासा मिळाला आहे. मात्र निवडणूक प्रक्रीया येथे कधी होणार याविषयीची अद्याप काहीच निर्णय नसल्याने इच्छुक मात्र हिरमुसले आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची घोषणा नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. ही घोषणा झाल्याने आता गावात देखील निवडणूका पार पडून गावांचा विकास महापालिकेच्या धर्तीवर होईल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तातडीने निवडणूक प्रक्रीया सुरु झाली असून आधीच्या प्रभाग रचनेत काहीही बदल न झाल्याने गावांना निवडणुकीपासून दूरच रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावांचा समावेश पालिकेत होण्यास आणखी किती कालावधी लागणार, गावांत निवडणुका कधी होणार, निवडणूका झाल्या नाही तर विकास कामे देखील रखडणार आदि अनेक प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत होते. ग्रामस्थांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी बुधवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून कोकण आयुक्तांकडे गेला असून गावांचा पालिकेत समावेश करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी यावेळी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रीया सुरु झाली असून गावांचा समावेश पालिकेत करण्याविषयी अद्याप अध्यादेश निघाले नसल्याने या निवडणूकीत गावांचा समावेश करण्यात आलेला नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. या प्रक्रीयेसाठी किती कालावधी लागेल हे अद्याप स्पष्ट नसले तरी आधीच विलंब झालेल्या पालिका निवडणूक गावांचा समावेश झाल्यावर पुन्हा घेण्यात येणार का? यासाठीचा इच्छुकांना पुन्हा प्रयत्न करावे लागणार का? त्यासाठी इच्छुकांना, पक्षाचा होणारा खर्च आदि गोष्टी पहाता गावांचा समावेश होण्यास पाच वर्षाचा विलंब तर लावला जाणार नाही ना? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. यामुळे गावांमध्ये निवडणुका कधी होतील हे स्पष्ट नसल्याने निवडणुकांशिवाय विकास शक्य असल्याचे आश्वासन राजकीय नेते मंडळी देऊ लागली आहेत का ? हेही विचार करण्यासारखे आहे.

14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला, त्याचा निर्णय देखील अधिवेशनात घेतला. परंतू आता निवडणूक प्रक्रीया ही जी काही थांबली होती ती सुप्रिय कोर्टाच्या डायरेक्शनने सुरु करण्याचा आदेश झाला आहे. त्यामुळे तांत्रिक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल. तांत्रिक बाबी असल्या तरी 14 गावातील लोकांना ज्या मुलभूत सोयी सुविधा पाहिजे ते देण्याचे काम नक्की केले जाईल.

- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री

अधिवेशनात 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याविषयी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. ही प्रक्रीया कुठपर्यंत आली हे पहाण्यासाठी आज आयुक्तांची भेट घेतली असता हा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी कोकण आयुक्तांकडे पाठविला असल्याचे समजले. सकारात्मक प्रतिसाद दिसत असून पालकमंत्री स्वतः यात लक्ष देत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. सध्या येथे निवडणूका होणार नसतील तरी येत्या काळात लवकरच ही गावे पालिकेत येतील अशी लक्षणं दिसत आहेत.

- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण विधानसभा

निवडणूक आणि गावातील विकासकामांच्या अनुषंगाने होणारी अपेक्षित अशी विकास कामे या दोन स्वतंत्र बाजू आहेत. 14 गावे समाविष्ट होण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर तर त्याठिकाणी ज्या विकास कामांची आवश्यकता आहे ती तातडीने हाती घेतली जाऊ शकतात, त्याची अडचण नाही आली पाहीजे. महापालिका निवडणूक प्रलंबित असल्याने एकीकडे निवडणुकीची प्रक्रीया सुरु आहे, तर दुसरीकडे 14 गाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजून अध्यादेश निघालेला नसल्यामुळे या गावांचा समावेश सध्याच्या प्रभाग रचनेत करण्यात आलेला नाही. मात्र जेव्हा अध्यादेश निघेल त्यावेळी तत्कालीन परिस्थिती नुसार माननीय आयोग जे निर्देश देईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका

Web Title: Development Of 14 Villages In Navi Mumbai Municipal Corporation Is Possible Even Without Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top