फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

Devendra Fadnavis may become new finance minister of India
Devendra Fadnavis may become new finance minister of India

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही काळात राजकीय वातावरण ढवळून निघालं. या सगळ्यात केंद्रस्थानी होते ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातील 5 वर्षांची फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजपाची सरकारची सत्ता आणि त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी केलेले प्रयत्न आपण सर्वांनीच पाहिले. दरम्यान आता महाराष्ट्राचे भाजपचे 'हेवी वेट' नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी थेट केंद्रात लागणार आहे. केंद्रातील मंत्रिमंडळात येत्या काळात मोठे बदल झालेले पाहायला मिळू शकतात आणि यामध्ये भाजपचा महाराष्ट्रातील क्लीन चेहरा म्हणून ओळख असलेले फडणवीस देखील दिसू शकतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देशाच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची कुजबुज आहे . 

गेली दोन वर्षे भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन कामकाज संभाळतायत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपेक्षेस निर्मला सीतारामन खऱ्या उतरत नाहीयेत, म्हणून नरेंद्र मोदी सीतारामन यांच्या कामावर फारसे खुश नाहीयेत असं बोललं जातंय. देवेंद्र फडणवीस दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत आहेत, अशात दिल्लीत असतानाच फडणवीस यांना 'ती' गोड बातमी मिळू शकते. फडणवीस यांच्याकडे देशाच्या बजेटची जबाबदारी जाऊ शकते. त्यामुळे पुढचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला तर आश्चर्य वाटायला नको.

मग महाराष्ट्रात काय होणार?

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात विरोधीपक्षनेते म्हणून काम पाहतायत. फडणवीसांची वर्णी केंद्रात लागली तर विरोधीपक्षनेतेपद रिकामं होईल. महाराष्ट्रातून भाजपचे सध्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे गेल्या सरकारच्या काळातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणारे एकनाथ एकनाथ खडसे यांचं नाव विरोधीपक्षनेतेपदी निश्चित होऊ शकतं. या पदावर चंद्रकांत पाटलांची वर्णी लागल्यास भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जागा रिकामी होते. अशात पंकजा मुंडे यांचं प्रमोशन भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून होऊ शकतं. फडणवीस यांना दिल्लीत बोलावून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना आणि भाजपमधील तुटलेले कनेक्शन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न देखील नक्कीच केला जाईल. 

दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता केंद्रात गेला तर केंद्रातील महाराष्ट्राची ताकद देखील वाढेल. गडकरी आणि प्रकाश जवडेकरांसोबत महाराष्ट्रातील तरुण चेहरा दिल्लीत पाहायला मिळेल. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या शक्यता फेटाळल्या जरी असल्या तरीही राजकारणात नाही म्हणजे 'हो' असतं राजकीय विश्लेषक म्हणतायत  

गेल्या काळात मनोहर पर्रीकर, अरुण जेटली त्याचबरोबर सुषमा स्वराज यांच्या जाण्याने केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पोकळी निर्माण झालीये. फडणवीस यांना केंद्रात बोलावलं तर फडणवीस थेट नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करताना पाहायला मिळतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com