esakal | भरपावसात भाविकांची खरेदीसाठी झुंबड; गणेशोत्सवामुळे फुलांना सोन्याची झळाळी..!
sakal

बोलून बातमी शोधा

भरपावसात भाविकांची खरेदीसाठी झुंबड; गणेशोत्सवामुळे फुलांना सोन्याची झळाळी..!

सर्वांच्या लाडक्‍या गणरायाचे उद्या (शनिवारी) घरोघरी आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी लागणारी फुले, फळे खरेदी करण्यासाठी आज सकाळपासून कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातील भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.

भरपावसात भाविकांची खरेदीसाठी झुंबड; गणेशोत्सवामुळे फुलांना सोन्याची झळाळी..!

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : सर्वांच्या लाडक्‍या गणरायाचे उद्या (शनिवारी) घरोघरी आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी लागणारी फुले, फळे खरेदी करण्यासाठी आज सकाळपासून कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातील भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. पावसाचा जोर जास्त असतानाही भाविकांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला दिसला नाही. अगदी काल-परवापर्यंत सुनीसुनी वाटणारी बाजारपेठ शुक्रवारी मात्र भाविकांनी फुलून गेल्याने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. त्यातच बाजारात फुलांनाही सोन्याची झळाळी प्राप्त झाली. 400 रुपये किलो दराने सर्व प्रकारची फुले विकली जात होती. मागणीच्या मानाने फुलांची आवक बाजारात कमी झाल्याने फुलांचे दर अवघ्या एका दिवसात दुप्पट झाल्याचे बाजारात पाहावयास मिळाले. 

ही बातमी वाचली का? मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी राज्यभरातून 72 गाड्यांमधून सुमारे 1 हजार 67 क्विंटल फुलांची आवक झाली. गणेशोत्सव काळात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 200 च्या आसपास फुलांच्या गाड्या बाजारात दाखल होतात; परंतु या वर्षी कोरोनाचे सावट, जिल्हा-राज्य सीमा बंदी, तसेच गेले चार-पाच दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे केवळ 72 गाड्या फुलांची आवक बाजारात झाली. अंबरनाथ, बदलापूर यांसारख्या जवळच्या शहरांमधून तसेच पुणे, सिन्नर, अकोला, जुन्नर, अहमदनगर, सातारा व सांगली या जिल्ह्यातून कल्याणच्या बाजारात फुले येतात. मात्र, पावसाचा परिणाम मालावर झाला असून फुले भिजल्याने ही फुले लवकर खराब होत आहेत. त्यामुळे फुलांचे दर तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपासून कल्याण-डोंबिवलीत असलेला पावसाचा जोर शुक्रवारी सकाळीही कायम होता; परंतु पावसाला न जुमानता सकाळी 6 वाजल्यापासूनच भाविकांनी फुले, फळे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. 

ही बातमी वाचली का? आयबीपीएस परिक्षेला लाखो विद्यार्थी मुकणार? पदवीचे अंतिम वर्ष रखडल्याने नुकसान

नाजूक जास्वंदाला सर्वाधिक भाव... 
वसई व विरार तालुक्‍यातून जास्वंदीची फुले मुंबई, ठाणे व कल्याण परिसरात विक्रीसाठी येतात. जास्वंदीची फुले ही एकच दिवस टिकतात. पावसाच्या तडाख्यामुळे फुले झाडावरच कुजत असल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जास्वंद सगळ्यात महाग फूल ठरले असून बाप्पाच्या आवडत्या एका फुलासाठी गणेशभक्तांना तब्बल 60 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. 

गणपती उत्सवामुळे आज बाजारात सकाळपासूनच भाविकांची रिघ लागली होती. सध्या सर्वच फुलांचे दर हे चढे आहेत. घाऊक बाजारात मालाची आवक कमी असल्याने फुलांचे दर चढे आहेत. दरवर्षी भाविक पूजेसाठी तसेच सजावटीसाठीही फुलांची खरेदी करत असत; परंतु या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने भाविक एक ते दोन किलो फुलांची मागणी करत आहेत. त्यातही मिक्‍स फुलांची मागणी करत असल्याने या वर्षी फुलांचे वेगवेगळे दर न लावता आम्ही सरसकट सर्व फुलांचे दर हे 400 रुपये किलो असे ठेवले आहेत. 
- रिंकू चव्हाण, फुल व्यापारी. 

-----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

loading image
go to top