esakal | धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर,  फक्त 'इतकेच' अॅक्टिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर,  फक्त 'इतकेच' अॅक्टिव्ह रुग्ण

मंगळवारी धारावीत कोरोनाचे फक्त ११ नवे रुग्ण आढळून आलेत. धारावीतील एकूण रुग्णसंख्या २ हजार ३९२ वर गेली आहे. धारावीत आता फक्त ८६ अॅक्टिव्ह रुग्ण उरलेत.

धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर,  फक्त 'इतकेच' अॅक्टिव्ह रुग्ण

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः काही दिवसांपूर्वी कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या प्रयत्नांची दखल घेत धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे.  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. धारावीतील घरांची रचना, मोठी लोकसंख्या, लहान जागा, चिंचोळ्या गल्ल्या यामुळे येथे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक होता. आता धारावीनं कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असून लवकरच कोरोनाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.  मंगळवारी धारावीत कोरोनाचे फक्त ११ नवे रुग्ण आढळून आलेत. धारावीतील एकूण रुग्णसंख्या २ हजार ३९२ वर गेली आहे. धारावीत आता फक्त ८६ अॅक्टिव्ह रुग्ण उरलेत.

अॅक्टिव्ह असलेल्या  रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी आढळला होता. धारावी झोपडपट्टीत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि सरकार हादरलं होतं. धारावीत वेगाने कोरोना संसर्ग पसरत असताना या भागातील संसर्गाची साखळी कशी तोडायची, असा गहन प्रश्न आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला पडला होता. धारावीकरांनी दाखवलेली अभूतपूर्व अशी स्वयंशिस्त आणि पालिका व सामाजिक संस्थांनी अहोरात्र केलेली मेहनत याच्या जोरावर धारावीने करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात धारावीत कोरोना संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. धारावीत आता अवधे ८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अधिक वाचाः  संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

धारावीत राबवण्यात आलेल्या चेस द व्हायरस या उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फीवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाइन सेंटर्स यामुळे या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

हेही वाचाः मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस, जाणून घ्या पावसाचे प्रत्येक अपडेट्स

धारावीत १४ हजार ९७० लोकांचे मोबाइल व्हॅन द्वारे स्कॅनिंग करण्यात आले. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला. १४ हजार लोकांना संस्थात्मक कॉरंटाइन करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले. 

मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धारावीच्या यशावर आपल्या भावना व्यक्त केल्या. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या शब्दात धारावीकर आणि प्रशासनाचं कौतुक केलं.

dharavi covid 19 chase the virus only 86 patients active

loading image