ढोल-ताशा पथकांत महिलाराज

ढोल-ताशा पथकांत महिलांचा वाढता सहभाग
ढोल-ताशा पथकांत महिलांचा वाढता सहभाग

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीपासूनच ढोल-ताशांचा आवाज घुमायला सुरुवात होते; मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या ढोला-ताशा पथकांमध्ये मुली व महिलांचा सहभाग वाढताना दिसत आहे. यात शाळकरी मुलींपासून ५५ वर्षांपर्यंतच्या महिला आपले व्याप सांभाळून उत्साहाने सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे. 

नवी मुंबईत २० हून अधिक पथके आहेत. डीजेबंदीमुळे ढोल-ताशा या पथकांची मागणीदेखील वाढली आहे. त्यातच आता या पथकांमध्ये एक-दोन वर्षांपासून मुली व महिलांचा सहभाग वाढताना दिसत आहे. महिला आपली कामे सांभाळून उत्साहाने व बेधुंद ऊर्जेने सराव करत आहेत. सरावात कमरेवर उठलेल्या रस्सीचे वळ, ठणकणारे पाय आणि फाटलेल्या बोटांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून पुरुष सहकाऱ्यांच्या तोडीस तोड ढोल-ताशा वाजवत, आपल्या भक्तीची आणि ऊर्जेची उधळण करणाऱ्या महिला व मुली मिरवणुकींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदूही ठरत आहेत. 

खारघर येथील उत्सव ढोल-ताशा ध्वज आणि झांज पथकाच्या आशीष बाबर याने सांगितले की, सध्या आमच्या पथकात ७५ टक्के महिला व मुली आहेत. विविध वयाच्या व क्षेत्रातील या सगळ्या जणी फक्त ढोल-ताशाच्या प्रेमासाठी, भक्तीसाठी व आपापल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकत्र येतात. तर महिला, मुली स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकतात. या प्रकारच्या खेळांमधून आपली परंपरा जपली जावी, कलागुणांना वाव मिळावा व तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळावी हा मंडळांचा मुख्य हेतू आहे, असे नेरूळ येथील शंकूल ढोल-ताशा पथकाच्या मयूर वाळके यांनी सांगितले. 

खारघरचा राजा ‘उत्सव’ पथकात ढोलवादक असून, कुटुंब, व्यवसाय; तसेच सामाजिक कार्य सांभाळून पथकामध्ये ढोलवादन करते. दोन्ही मुलीदेखील वादन करतात. ढोलवादन करताना कामाचा ताण जाणवत नाही. एक वेगळीच ऊर्जा मिळते. 
- वैष्णवी शिंदे, वकील

उत्सव पथकात दोन वर्षांपासून ढोल-वादक म्हणून हे दुसरे वर्ष. आपले सण-उत्सव पारंपरिक वाद्य वाजवून साजरे करण्याची मजा काही वेगळीच असते.
- सोनम जाधव, ढोलवादक 

८ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही ढोल-ताशा पथक सुरू केले, तेव्हा नवी मुंबईमध्ये मुळातच ढोल-ताशा पथके कमी होती. त्यातच मुलींची संख्या अजूनच कमी. पण सध्या आमच्याकडे ४० सदस्य असून, त्यात २५ मुली आहेत. 
- स्वप्नील जाधव, नादगर्जा ढोल-ताशा पथक, ऐरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com