esakal | मुंबईतील उखडलेले पदपथ चकाचक होणार
sakal

बोलून बातमी शोधा

footpath

मुंबईतील उखडलेले पदपथ चकाचक होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरातील पदपथ म्हणजे उखडलेले पेव्हर ब्लॉक, त्यावर पडलेले खड्डे. त्यावरून अपंगच काय सामान्य माणूसही चालू शकत नाही, अशी स्थिती; परंतु आता हे चित्र बदलणार आहे. काळा घोडा येथील पदपथाचे रूप प्रायोगिक तत्त्वावर बदलल्यानंतर आता महापालिका मुंबईतील काही पदपथांचे रूप बदलणार आहे. पाच पदपथांच्या दुरुस्तीसह सुशोभीकरणासाठी महापालिका तब्बल ५१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

माटुंगा आणि चेंबूर येथील दोन पदपथांच्या दुरुस्तीसह सुशोभीकरणासाठी ३२ कोटी ४ लाख, तर गोरेगाव येथील एमजी मार्ग, वांद्रे पूर्व येथील आरकेपी व संत ज्ञानेश्‍वर मंदिराच्या रस्त्यालगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी ७० लाख असे एकूण ५१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

मुंबईत १८०० किलोमीटरहून अधिक लांबीचे पदपथ आहेत; मात्र त्यातील बहुतांश पदपथ हे चालण्यायोग्य नाहीत. पालिकेने पदपथांच्या सुशोभीकरणासह दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार काळा घोडा येथील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’समोरील पदपथाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यात बसथांब्याचे रूप पालटण्याबरोबर अपंगांना व्हीलचेअर पदपथावर घेऊन जाता येईल, अशा पद्धतीने दुरुस्ती केली आहे. त्याच धर्तीवर माटुंगा आणि चेंबूर येथील पदपथाची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

कमी खर्चात कामाची तयारी

महापालिकेने माटुंगा आणि चेंबूर येथील पदपथांच्या दुरुस्तीसाठी ४२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते; मात्र कंत्राटदाराने २३ टक्के कमी किमतीत म्हणजे ३२ कोटी रुपयांत, तर पश्‍चिम उपनगरातील तीन पदपथांच्या दुरुस्तीसाठी २७ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते; मात्र कंत्राटदाराने हे काम १९ कोटी ७० लाख रुपयात करण्याची तयारी दाखवली आहे.

हेही वाचा: जामीन अर्ज रद्द करण्याची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

कुठे होणार सुशोभीकरण

चेंबूर रेल्वेस्थानक ते डायमंड उद्यानापर्यंतचा तीन किलोमीटरच्या पदपथाची अवस्था खराब आहे. हा पदपथ सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार असून त्याचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. वडाळ्याच्या सेंट जोसेफ सर्कल ते माटुंगा येथील रुईया महाविद्यालयापर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा पदपथ बेसाल्ट दगडाचा आहे. या पदपथाचीही दुरवस्था झाली आहे. या पदपथाखालील उपयोगित सेवांचे जाळे कमी खोलीवर असल्याने दुरुस्ती सिमेंट काँक्रीटने करण्यात येणार आहे.गोरेगाव येथील एमजी मार्गाचे पट्टे आणि पदपथ पेव्हर ब्लॉकचे आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणाबरोबरच पदपथ सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. वांद्रे येथील आरकेपी मार्ग आणि संत ज्ञानेश्‍वर मंदिरापर्यंत पट्ट्यांच्या डांबरीकरणाबरोबरच पदपथ सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे.

loading image
go to top