पोलिस महासंचालक सन्मानचिन्हे जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

महाराष्ट्र दिनाच्या समारंभात 720 जणांचा करणार गौरव

महाराष्ट्र दिनाच्या समारंभात 720 जणांचा करणार गौरव
मुंबई - राज्य पोलिस महासंचालकांकडून देण्यात येणारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदके जाहीर करण्यात आली आहेत. पोलिस शौर्यपदक, तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपतिपदक प्राप्त अधिकारी व अंमलदार अशा एकूण 22 जणांसह राज्य पोलिस दलात उत्तम कामगिरी बजावलेल्यांसाठी 720 जणांना ही पदके मिळाली आहेत. राज्यातील मुख्यालयाच्या संचलन मैदानावर 1 मे या महाराष्ट्रदिनी होणाऱ्या समारंभात ही पदके देण्यात येतील.

मुंबई पोलिस दलातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे यांच्यासह नऊ जणांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देण्यात येईल. क्‍लिष्ट व थरारक, बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल करणारे मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त अनिल वालझडे, नागरी हक्क संरक्षण मुंबई विभागातील पोलिस हवालदार सुनील रामचंद्र गीते यांच्यासह अन्य अधिकारी अंमलदार, तसेच 15 वर्षे सतत चांगली कामगिरी बजावणाऱ्यांना महासंचालकाकंडून पदके देण्यात येतात.

विशेष शाखेमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या "मुंबई फोर्स वन'चे निरीक्षक बापू ओवे व नांदेड एटीएसचे निरीक्षक माणिक बेंद्रे यांच्यासह प्रशंसनीय स्वरूपाचे काम केल्याबद्दल, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांत चांगले यश मिळवल्याबद्दल, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली उत्तम कामगिरी आणि दरोडेखोर, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांविरोधात केलेली कारवाई यासाठी 720 अधिकारी आणि अंमलदारांना महासंचालक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मुंबई पोलिस दलातील सशस्त्र नायगाव दलाच्या अप्पर पोलिस आयुक्त अश्‍वती दोरजे व राज्य गुप्त वार्ता विभागाचे सह आयुक्त संतोष रस्तोगी यांना सन्मानित करण्यात येईल. नक्षलग्रस्त विभाग असलेल्या गडचिरोलीत कर्तव्य बजावत असलेले सहायक पोलिस निरीक्षक मनोहर कोरेटी यांच्यासह आठ जणांना शौर्यपदक मिळणार आहे. राज्य दहशतवादविरोधी विभागाचे (एटीएस) उपमहानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्यासह 12 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Director General of Police Honorary Declaration