प्लास्टिकमधून साकारले अस्वच्छ शहर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

प्लास्टिक कचऱ्याचे प्रकार, त्यांचे विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी आदींविषयी नागरिकांना योग्य माहिती व्हावी, यासाठी विसेक इंडिया संस्थेच्यावतीने ठाण्यात कलाभवन येथे एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे दिसणाऱ्या अस्वच्छ शहराचा चेहरा मांडला असून हे चित्र सुधारण्यासाठी तुमच्याजवळ असलेले प्लास्टिक येथे घेऊन या, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे : प्लास्टिक कचऱ्याचे प्रकार, त्यांचे विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी आदींविषयी नागरिकांना योग्य माहिती व्हावी, यासाठी विसेक इंडिया संस्थेच्यावतीने ठाण्यात कलाभवन येथे एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे दिसणाऱ्या अस्वच्छ शहराचा चेहरा मांडला असून हे चित्र सुधारण्यासाठी तुमच्याजवळ असलेले प्लास्टिक येथे घेऊन या, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातून प्लास्टिक मुक्त शहर हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे विजयकुमार कुट्टी यांनी सांगितले. ठाण्यातील कलाभवन येथे ठाणे पालिका व विसेक इंडिया संस्थेच्या वतीने प्लास्टिकचे दुष्परिणाम दाखविणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ११ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. 

येथे येणाऱ्यांनी दोन किलोपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा दान केल्यास प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या कौतुकाचे चिन्ह म्हणून इको फ्रेण्डली वस्तू भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत. गुजरात आणि हरिद्वारमधून आणलेल्या दगडांवर प्लास्टिकविषयी विचार आणि संदेश रेखाटायचे आहेत. उत्तम संदेश व चित्र रेखाटणाऱ्या २० स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. बेडेकर महाविद्यालय, आर. जे. ठाकूर महाविद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असल्याचे कुट्टी यांनी सांगितले. 

वर्गीकरणानुसार प्लास्टिकची माहिती
नागरिकांनी येताना प्लास्टिक घेऊन येणे असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आणलेल्या प्लास्टिकचे वजन करून ते कोणत्या वर्गात मोडते हेही सांगितले जाते. प्लास्टिकचे १ ते ७ प्रकारात वर्गीकरण होत असून १ ते ४ प्रकारातील प्लास्टिकचे विघटन काही कंपन्यांच्यावतीने केले जाते; तर ५ ते ७ प्रकारातील प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. हे प्रकार कोणते, आपल्या घरातील प्लास्टिक कोणत्या प्रकारात मोडते याची माहिती प्रदर्शनात दिली जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dirty city made of plastic