आधार कार्ड केंद्राअभावी नागरिकांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एफ विभाग कार्यालयात जागा नसल्याने आठ महिन्यांपासून आधार कार्ड केंद्र बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आधार कार्डच्या कामासाठी नागरिकांना कोपरखैरणे किंवा ऐरोलीपर्यंत हेलपाटे मारावे लागतात. त्यात वेळ व प्रवासखर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे घणसोलीत आधार कार्ड त्वरित सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

अनेक सरकारी कामांमध्ये आधार कार्डची महत्त्वाचा पुरावा म्हणून गरज भासते. पालिकेच्या माध्यमातून सध्या घणसोली प्रभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्या ठिकाणी तरी आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयामंध्ये आधार कार्ड केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्रांची लोकवस्ती असणाऱ्या घणसोली प्रभाग समिती कार्यालयात आठ ते नऊ महिन्यांपूर्वी आधार केंद्र सुरू करण्यात आले; परंतु आधार कार्ड काढण्याचे साहित्य ठेवण्याकरिता आणि नागरिकांची होणारी गर्दी पाहता जागा नसल्याने अवघ्या काही दिवसांतच हे आधार केंद्र बंद करण्यात आले. यामुळे येथील नागरिकांना आधार कार्डच्या कामासाठी खासगी आधार कार्ड केंद्रावर जाऊन जादा पैसे मोजून कार्ड काढावे लागत आहे. तर अनेक नागरिकांना ऐरोली, कोपरखैरणे येथे प्रवासखर्चाचा भुर्दंड सोसून कार्ड काढण्यासाठी जावे लागत आहे.

घणसोली विभाग कार्यालयामध्ये अपुऱ्या जागेतच येथील कारभार चालविला जात आहे. नूतनीकरणानंतर जागा उपलब्ध झाल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊन आधार कार्ड केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- दत्तात्रय नागरे, सहायक आयुक्त; घणसोली विभाग

घणसोलीमध्ये आधार कार्ड केंद्र नसल्यामुळे येथील रहिवाशांना ऐरोली किंवा वाशीला जावे लागते. यात वेळ व पैशाचा नाहक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे घणसोलीत आधार कार्ड केंद्र सुरू केले पाहिजे.
- समीर पाटील, नागरिक

Web Title: Disadvantage of citizens for wanting Aadhaar card center