शहराचे आपत्ती व्यवस्थापन धोक्‍यात; स्वतंत्र पथकाचा अभाव

शहराचे आपत्ती व्यवस्थापन धोक्‍यात; स्वतंत्र पथकाचा अभाव

नवी मुंबई : भिंती कोसळणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना आणि पूरपरिस्थितींसारख्या अस्मानी संकटांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वतंत्र पथकाचा महापालिकेत अभाव आहे. शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विभाग कार्यालय अथवा अग्निशमन दलाच्या जवानांचाच वापर केला जातो. नवी मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र पथक नसल्यामुळे शहरावर एखादे संकट ओढावल्यास बचाव कार्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत एक जुनी भिंत कोसळून काही लोकांचा जीव गेला. कोकणात तिवरे धरण फुटून वाड्याच्या वाड्या वाहून गेल्या. यासारखी अनेक घटना पावसामुळे घडल्या. या सर्व घटनांमध्ये (एनडीआरएफ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी बचावकार्य केले. मुंबईत एखादी घटना घडल्यास त्याठिकाणी बचावकार्य करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे एक पथक तैनात असते; मात्र 14 लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात एखादी आपत्ती ओढावली तर बचावकार्य करण्यासाठी महापालिकेला अग्निशमन दलाचे जवान अथवा विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

महापालिकेला स्थापन झाल्यापासून 25 वर्षांच्या कारकिर्दीत आपत्कालन व्यवस्थापनाचे एक स्वतंत्र पथक तयार करता आलेले नाही. महापालिकेचे कामकाज सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्या खांद्यावर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज सोपवण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयाच्या एका कोपऱ्यात प्रशासनाने आपत्कालीन कक्ष तयार केला आहे. या कक्षात 24 तास हॉटलाईन, वायरलेस प्रणाली सर्व सरकारी कार्यालये, पोलिस, रुग्णवाहिका, रुग्णालय आदी अत्यावश्‍यक सेवांशी जोडलेली असते; मात्र या बाहेरच्या जगतात काय घडतेय, हे पाहण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांना ना खिडक्‍या आहेत, ना एक टीव्ही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना जेव्हा एखादी घटना दूरध्वनी अथवा वायरलेसवरून समजेल, तेव्हाच घटनास्थळी मदतकार्य पोहचू शकते.

काही दिवसांपूर्वी यूएनडीपी (संयुक्त राष्ट्रे) मार्फत शहराचा आपत्ती धोका निवारण आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता; मात्र तो प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी फेटाळल्यामुळे सरकारचा आपत्ती धोका निवारण आराखडा तयार करण्याचे काम रखडणार आहे. 

नोडनिहाय पथक 
26 जुलै 2005 ला आलेल्या पुरानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय आपत्ती व्यवस्थापनाचे दहा सदस्यसंख्येचे प्रत्येकी एक पथक तयार करण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते, मच्छीमार, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले सदस्य, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी असे मिळून हे पथक तयार करण्यात आले. 

राज्यात कोणत्याच महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र पथक नाही. शहरात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफचेच पथक बोलवले जाते; मात्र एनडीआरएफच्या तज्ज्ञांकडून आपल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आपण केले आहे. तसेच प्रशिक्षित व्यक्तींचा त्या पथकामध्ये समावेश केला आहे. - डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com