BMC : प्रत्येक प्रभागासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा; स्वतंत्र टीम तयार करणार | Mumbai News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : प्रत्येक प्रभागासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा; स्वतंत्र टीम तयार करणार

मुंबई : महापालिका (BMC) मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा (Disaster Management plan) तयार करत आहे. त्यासाठी प्रभागांमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्वतंत्र टीम (Special Team) तयार करण्यात येणार आहे. ही टीम आपल्या विभागातील संभाव्य आपत्तींसह त्यापासून बचावाचा आराखडा तयार करणार आहे. आराखडा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जीआयएस मॅपिंगही (GIS Mapping) करण्यात येणार आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख तुरुंगातच; न्यायालयाने पुन्हा फेटाळला जामीन

मुंबईला पूर, दरड कोसळणे असे धोके दरवर्षीचेच आहेत. त्याचबरोबर मुंबईचा मोठा भाग भूकंपाच्या सदोष रेषेतही आहे. आग, इमारत कोसळणे, दहशतवादी हल्ला, रासायानिक, आण्विक दुर्घटना अथवा हल्ला अशा प्रकारचे २७ धोके मुंबईला आहेत. त्या धोक्यांपासून बचावासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईबरोबरच प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आराखडा करण्यात येणार आहे.

नव्याने नियुक्त करण्यात येणारा अधिकारी हा आपत्ती व्यवस्थापनात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल. हा आराखडा तयार करण्यासाठी पालिकेच्या २४ प्रभागांतील आपत्ती नियंत्रण विभागात ‘ड्युटी ऑफिसर’ची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा अधिकारी तसेच प्रभागातील अभियंता आणि सुरक्षा अधिकारी मिळून त्यांच्या प्रभागातील आपत्ती नियंत्रण आराखडा तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी ‘आपत्ती निवारण कृती आराखडा’ तयार करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणामुळे BMC च्या निवडणुका लांबल्या; इच्छूकांचा खिसा हलका

आराखडा अधिक प्रभावी करण्यासाठी जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत वेगाने यंत्रणा हाताळण्याबरोबर तात्काळ मदतकार्य पोहोचवणे, रहिवाशांचे पुनर्वसन करणे आदी उपाय वेगाने करता येणार आहेत, असेही सांगण्यात आले.

मिठी नदीच्या धर्तीवर आराखडा

महापालिकेने मिठी नदीचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यात मिठी नदीची पातळी किती मीटरपर्यंत वाढल्यास कोणत्या परिसराला फटका बसेल, याचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार पालिका सध्या कार्यवाही करत आहे. अशाच धर्तीवर हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

काय काम होणार?

- प्रभागातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोके ओळखणे
- धोक्यांचा प्रभाव किती नागरिकांना बसू शकेल याचा अंदाज घेणे
- नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करणे
- नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना प्रशिक्षित करणे

Web Title: Disaster Management Plan For Every Ward In Mumbai As Special Team Will Be Formed Bmc News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top