बारवी धरणासंदर्भात महासभेत चर्चा घ्या; प्रताप सरनाईक यांची महापौरांकडे मागणी

बारवी धरणासंदर्भात महासभेत चर्चा घ्या; प्रताप सरनाईक यांची महापौरांकडे मागणी


ठाणे  ः महापालिका बारवी धरणातून वाढीव दहा दशलक्ष लीटर पाणी मिळविण्यासाठी आशेने बसली आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हे धरणच थेट ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करावे अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेला घेऊन तसा ठराव करुन राज्यशासनाकडे पाठविल्यास त्यावर विचार होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या महासभेत हा विषय महासभेच्या पटलावर चर्चेसाठी घेण्यात यावा अशी मागणी आमदार सरनाईक यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

सद्यस्थितीत बारवी धरणातून एम.आय.डी.सी. मार्फत उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे व मिरा-भाइर्दर महानगरपालिकेस तसेच औद्योगिक क्षेत्रास पाणी पुरवठा होतो. या धरणाची उंची मागील वर्षापासून वाढवल्यामुळे अतिरिक्त पाणी साठा निर्माण झाला आहे. वाढीव उंचीनुसार बारवी धरणाची पाणी साठवण क्षमता अंदाजे 932 दशलक्ष लि. असून त्यापैकी ठाणे  महानगरपालिका 110 दशलक्ष लि. पाणी पुरवठा घेत आहे. हा पाणी साठा  एम.एम.आर. रिजनमधील महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उपयोगी पडून ठाणे महानगरपालिका इतर महानगरपालिकांना पाण्यासाठी सहकार्य करु शकणार आहे. त्यात सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही स्वत:चे धरण नसल्यामुळे इतर संस्थेवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागत आहे. बारवी धरण हे एम.आय.डी.सी. च्या मालकीचे आहे. 

राज्यामध्ये कुठेही धरणाचे पाणी महापालिकांना विकण्याची जबाबदारी ही एम.आय.डी.सी.ची नसते. तर फक्त त्यांच्या लघुउद्योगांना व उद्योगांना पाणी पुरवठा करण्याचे काम एम.आय.डी.सी. करते, परंतू बारवी धरणातून मात्र प्रमुख्याने उद्योगांपेक्षा महानगरपालिकांनाच जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. ज्याप्रमाणे नवी-मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेऊन त्यांचा पाणी प्रश्न सोडविला त्याच धर्तीवर बारवी धरण राज्य शासनाने महापालिकेला विकत द्यावे. त्यासाठी महापालिका स्वत:चा निधी व काही राज्य शासनाकडून अनुदान व काही कर्ज उपलब्ध करून नक्कीच बारवी धरण विकत घेईल अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भातील चर्चा होऊन ठाणे महानगरपालिकेचा सकारात्मक प्रस्ताव राज्य शासनाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राज्यशासनही सुद्धा त्या संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता मंगळवारी होणाऱ्या महासभेत हा विषय चर्चेसाठी घ्यावा व तसा ठराव करुन तो राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com