ठाणे पालिकेचा ग्लोबल हॉस्पिटलसाठी कोट्यवधींचा प्रस्ताव; हिशोबावर भाजपाचा आक्षेप

राजेश मोरे
Monday, 19 October 2020

बाळकूम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी बिल्डरांच्या देणग्या थेट 'एमसीएचआय' आणि जितो ट्रस्ट'च्या तिजोरीत जमा झाल्या आहेत. त्याचा हिशोब अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

ठाणे   ः बाळकूम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी बिल्डरांच्या देणग्या थेट 'एमसीएचआय' आणि जितो ट्रस्ट'च्या तिजोरीत जमा झाल्या आहेत. त्याचा हिशोब अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. असे असतानाच आता ग्लोबल हॉस्पिटलमधील वाढीव बेडसाठी आणखी पंधरा कोटींचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. या प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

सावधान... मायोपिया बळावतोय! डोळे सांभाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातून सामाजिक कामांसाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधी जमा केला जातो. त्यातून सरकार वा महापालिकेला आरोग्यासह विविध कामे करता येतात. मात्र, कोरोनाच्या रुग्णांसाठी महापालिकेने `ग्लोबल हब' येथे उभारलेल्या हॉस्पिटलसाठी सीईआर निधीच्या सर्व देणग्या थेट एमसीएचआय व जितो ट्रस्टकडे सोपविण्याचा आदेश महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी काढला होता. त्यानंतर त्यांच्याकडून शहरातील बड्या बिल्डरांना पत्र पाठवून एमसीएचआय व जितोच्या खात्याचे क्रमांक देऊन निधी जमा करण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र, या हॉस्पिटलमध्ये जितो-एमसीएचआयची जबाबदारी नक्की कोणती असेल, याबाबत महापालिकेने खुलासा अद्यापि केलेला नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

मुंबईचे मैलापाणी देशी कंपन्या शुद्ध करणार; लवकरच कंत्राटदार निश्‍चितीची प्रक्रिया

आता ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणखी दिडशे खाटांचा अतिरिक्त आयसीयू कक्ष आणि दिडशे खाटांचा अतिरिक्त ऑक्सिजन सप्लायसह जनरल वॉर्ड, वैद्यकिय उपकरणे, फर्निचर आदी साहित्य महापालिकेने खरेदी केले. त्यासाठी आठ कोटी 43 लाख 77 हजार 879 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. वीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेपुढे प्रस्ताव क्र. 90 द्वारे ही माहिती देण्यात आली आहे. तर प्रस्ताव क्र. 113 द्वारे ग्लोबल हॉस्पिटलमध्येच आयसीयू व ऑक्सीजन बेड विस्तारीकरणाच्या कामासाठी सहा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार रुपये खर्च करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दोन प्रस्तावांवरून ग्लोबल हॉस्पिटलसाठी महापालिकेने चैादा कोटी 67 लाख 49 हजार 879 खर्च केला असल्याचे उघड होत आहे.

या हॉस्पिटलसाठी एमसीएचआय व जितो ट्रस्टने देणग्या जमा केल्या. त्यांनी हॉस्पिटलचा सर्व खर्च करण्याचे अपेक्षित होते. मग ठाणे महापालिकेकडून सुमारे पंधरा कोटी रुपये का खर्च करण्यात आला, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Municipal Corporation proposes crores for Global Hospital BJPs objection to the account