मनसेच्या त्या उलट्या बॅनरची चर्चा; राजू पाटील यांनी शिवसेनेला केले ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA RAJU PATIL

मनसेच्या त्या उलट्या बॅनरची चर्चा; राजू पाटील यांनी शिवसेनेला केले ट्रोल

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. मात्र रस्त्यांची कामे अद्याप सुरु झाली नसल्याने मनसे शिवसेनेवर टिकास्त्र करण्यात येत आहे. कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा अशी खोचक टिका करणारा बॅनर एमआयडीसी मध्ये लागले होते. त्यानंतर शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत शिवसेनेने आता अभिनंदनाचे बॅनर लावा असा चिमटा व्यासपीठावर काढला होता. भूमिपूजन होऊन महिना उलटला मात्र अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर मनसेच्यावतीने होळीच्या मुहूर्तावर लावण्यात आला असून जेव्हा प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल तेव्हा अभिनंदनाचा सरळ बॅनर लावू असे आवाहन आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला असून 20 वर्षापासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले होते. बॅनर लागून सहा सात महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने यावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे बॅनर तीनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून खासदार शिंदे यांना लगावला होता. तसेच मनसेने शिवसेनेला ट्रोल करीत ''कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा'' असा संदेश देणारे फलक एमआयडीसीत लावले होते. त्यानंतर 17 फेब्रुवारीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांसह मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. त्यावेळी खासदार शिंदे यांनी वचनपूर्ती केली आता अभिनंदनाचे बॅनर लागले पाहीजे अशी कोपरखळी मारली होती. त्यावर चांगले काम केले तर कौतुक नक्कीच करणार असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले होते.

मनसे आमदारांनी केले ट्विट

त्यानुसार अभिनंदनाचे बॅनर लावण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात काम सुरु होण्याची वाट पहात होतो. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन एक महिना झाला मात्र कामास अद्याप सुरुवात झालेली नसल्याने होळीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला पुन्हा ट्रोल केले आहे. आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले असून गेल्या महिन्यात याच दिवशी एमआयडीसी विभागातील रस्त्यांच्या काॅंक्रीटीकरणाच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घान झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरु करुन लवकरच हे बॅनर सरळ करुन लावायची संधी द्यावी ही विनंती अशी ट्विट आमदार पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.

उलट्या बॅनरवर नक्की काय

आम्ही अभिनंदन केले, तुम्ही काम कधी करणार? असा सवाल करीत उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच एमआयडीसी परिसरातील रस्ते लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रयत्न केलेल्या लोकप्रतिनिधी व नागरिकांचे मनसे अभिनंदन असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

याविषयी आमदार राजू पाटील म्हणाले, एमआयडीसीतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे उदघाटन मोठ्या जोरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्याआधीच मी बोललो होतो की काम चालू करा नागरिकांना त्रास होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला अभिनंदनाचे बॅनर लावावे लागतील असे सांगितले होते. त्यावर काम सुरु केल्यावर आम्ही तुमच्या अभिनंदनाचे बॅनर नक्की लावू असे आश्वासन मी त्यांना दिले होते. त्यानुसार बॅनर तयार करुन ठेवले आहेत. महिना उलटला काम काही चालू झालेले नाही. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, त्या अनुषंगानेच होळीचे निमित्त साधून व एक महिना पूर्तीनिमित्त एक उलटा बॅनर लावला आहे. खाली डोके वर पाय करुन तो वाचावा लागेल नागरिकांना. काम सुरु झाले की हे बॅनर आम्ही सरळ करु.

ग्राम पंचायतची कामे ही आपण केले आहे, असे लोकांना सांगायचे आणि कुठेतरी आम्ही कामे करतोय असे भासवायचे. मानपाडा रस्त्याचे काम मी स्वतः पीडब्ल्यूडी खात्याकडे पाठपुरावा करुन जो राज्य शासनाकडे विभाग येतो त्याच्याकडे पाठपुरावा करून आणले, त्या काम देखील ते आम्ही केल्याचे सांगतात. आमची हरकत नाहाी, कदाचित ठेकेदारावर प्रभाव टाकण्यासाठी अश्या गोष्टी होत असतील ते त्यांनी करावे परंतु कामे लवकर चालू करावी हीच आमची अपेक्षा आहे असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.