लाथाळ्यांनंतरही भाजप-सेनेत पुन्हा 'हनिमून'?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - झाले गेले विसरून जात पुन्हा एकदा जवळ येण्याच्या पर्वाला प्रारंभ झाला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतले निकाल तुल्यबळ असले तरी महापौरपद शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार असून, मुंबईबाहेर अन्य ठिकाणी महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. 

मुंबई - झाले गेले विसरून जात पुन्हा एकदा जवळ येण्याच्या पर्वाला प्रारंभ झाला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतले निकाल तुल्यबळ असले तरी महापौरपद शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार असून, मुंबईबाहेर अन्य ठिकाणी महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. 

मुंबईत बदललेली ताकद लक्षात घेता निकालांनंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद मागणार काय, यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी निकालांनंतर बघू असे मोघम उत्तर दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुलगा आमदार संतोष याच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आज मातोश्रीवर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेत जवळ येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना या वैचारिक समानता असलेल्या पक्षांनी एकत्र येण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे मत दोन्ही बाजूच्या चाणक्‍यांनी व्यक्‍त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शिवसेनेचे शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहोत असे मत व्यक्‍त केले होतेच, तर त्याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सन्मानजनक तोडगा काढल्यास युतीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

मुंबईच्या निकालात शिवसेनेला 114 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर या एकीकरण प्रक्रियेला खीळ बसेल एवढी एकमेव शंका सध्या व्यक्‍त केली जाते आहे. मात्र, वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपलाही मिळेल असा अंदाज व्यक्‍त केला जातो. त्यामुळे शिवसेनेकडून फारशी आडकाठी येणार नाही, असा अंदाज आहे. त्यामुळे मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप-शिवसेनेतील मैत्रिपर्वाला पुन्हा सुरवात झाल्याचे मानले जाते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्ता राखण्याचे महत्त्व कळत असल्याने एकत्र येणे अडचणीचे नाही असे एक गट सांगतो आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परस्परांच्या संपर्कात होते, असेही विश्‍वसनीयरित्या समजते. 

मंत्रिमंडळात मात्र हल्लाबोल? 
निकाल काहीही लागला तरी यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील ते सगळे ऐकण्याचे धोरण शिवसेना स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे. "व्हायब्रंट गुजरात'च्या कार्यक्रमाला जाऊन तेथे मुंबई स्टॉक एक्‍स्चेंजच्या उपकेंद्राचे उद्‌घाटन करणाऱ्या फडणवीसांना आता प्रत्येक निर्णयामागची कारणमीमांसा विचारली जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

अहमदाबादजवळच्या गिफ्ट या "एसईझेड' प्रकल्पाचा विकास मुंबईतील इंटरनॅशनल फायनान्स सेंटरला डावलून केला जात असल्याचा गंभीर आरोपही देसाई यांनी केला आहे. सुभाष देसाई यांच्यापाठोपाठ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही बुलेट ट्रेन प्रकरणाला विरोध सुरू केला आहे. गुजरातेत स्थानके असणाऱ्या या गाडीसाठी महाराष्ट्र सरकारने 25 टक्‍के योगदान का द्यावे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. रामदास कदम हेही कोणताही प्रस्ताव भाजप म्हणते त्याप्रमाणे मंत्रिमंडळात मंजूर करू देणार नाहीत, असेही एका नेत्याने सांगितले. त्यातच मातोश्रीशी जवळचे संबंध असलेल्या राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही कॅबिनेट मंत्री अधिकार देत नाहीत हा जुनाच आरोप नव्याने करण्यास प्रारंभ केला आहे. भाजप मंत्र्यांशी शिवसेनेच्या नव्या धोरणाबाबत संपर्क साधला असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, मंत्रिमंडळात सर्व निर्णय आजवर एकमताने झाले आहेत एवढेच ज्येष्ठ मंत्र्याने नमूद केले. 

Web Title: discussion for shivsena-bjp alliance