विधानपरिषद नियुक्तीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी, चार नावे कुणाची?

मृणालिनी नानिवडेकर
Thursday, 15 October 2020

विधानपरिषद नियुक्तीत १२ सदस्यांपैकी ४ जागा  मिळायलाच हव्यात या आग्रहामुळे बुधवारी कॉंग्रेसने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जावू नये असे सांगितले. सचिन सावंत, नसीम खान, सत्यजित तांबे आणि रजनीताई पाटील या चार नावांना पक्षांतर्गत विरोध होतो आहे.

मुंबई:  विधानपरिषद नियुक्तीत १२ सदस्यांपैकी ४ जागा  मिळायलाच हव्यात या आग्रहामुळे बुधवारी कॉंग्रेसने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जावू नये असे सांगितले. आजवर कॉंग्रेसच्या हाती काही आलेले नाही राज्यसभा असो किंवा विधानपरिषद प्रत्येक निवडणुकीत दुय्यम भूमिका घ्यावी लागल्याने या वेळी तडजोड नाही असे पक्षाचे धोरण आहे. त्यातच सचिन सावंत, नसीम खान, सत्यजित तांबे आणि रजनीताई पाटील या चार नावांना पक्षांतर्गत विरोध होतो आहे.

ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व का नाही तसेच अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व द्यायचे आहे तर निवडणुकीत पराभूत झालेल्या नसीम खान यांनाच का संधी असा प्रश्न पुढे आला आहे. आज महाराष्ट्राचे नवे प्रभारी पाटील यांच्यासमोरही पक्षांतर्गत नाराजी पुढे आली असे समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार नाही, नावे अंतिम केली जाणार नाहीत असे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अधिक वाचाः  सावधान, आज मुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज

शिवसेनेत आदेश बांदेकर ,मिलिंद नार्वेकर ,सचिन अहीर ही नावे जवळपास निश्चित आहेत असे सांगितले जाते.आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांचे नावही चर्चेत आहे. मात्र ते वयाचा निकष पूर्ण करतात काय ते तपासून पाहिले जाते आहे. महिला आघाडीनेही पदाची मागणी केली आहे.

खडसे आमदार?

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ज्येष्ठ भाजपनेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाईल अशी जोरदार चर्चा आहे. मात्र खडसे यांच्या प्रवेशाची चर्चा खरी आहे काय यावर अद्याप मौन बाळगले जाते आहे. महिलांना प्राधान्य देण्याचा शिरस्ता याही वेळी पाळला जाईल. मात्र १२ सदस्यांच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मान्यता देतील काय हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहेच.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Disgruntled in Congress over appointment of Legislative Council


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disgruntled in Congress over appointment of Legislative Council