वसई-विरार शहरात फेरीवाल्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पालिकेचे दुर्लक्ष

प्रसाद जोशी
Wednesday, 14 October 2020

एकीकडे रस्त्यांवर बेवारस वाहने, पार्किंग, वाहतूक कोंडी होत असताना वसई, विरार नालासोपारा शहरात फेरीवाल्यांचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. महापालिकेने अद्यापही कोणतेच फेरीवाला धोरण निश्‍चित न केल्याने रान मोकाट झाले आहे.

वसई ः कोरोना संसर्ग पसरत असताना उपाययोजनांवर भर दिला जात आहे; परंतु नागरिकच याला बगल देत असून, फेरीवालेदेखील वाढत असल्याने कोरोना गेला, अशी परिस्थिती सध्या वसई-विरारमध्ये दिसून येत आहे. याकडे वसई-विरार शहर महापालिकेने देखील पाठ फिरवली असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

एकीकडे रस्त्यांवर बेवारस वाहने, पार्किंग, वाहतूक कोंडी होत असताना वसई, विरार नालासोपारा शहरात फेरीवाल्यांचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. महापालिकेने अद्यापही कोणतेच फेरीवाला धोरण निश्‍चित न केल्याने रान मोकाट झाले आहे. वसईच्या आनंद नगर, साईनगर, माणिकपूर, अंबाडी मार्ग, नालासोपारा सेंट्रल पार्क, संतोष भुवन, नगिनदास पाडा, आचोळे मार्ग, तुळिंज, अलकापुरी, विरार पूर्व चंदनसार, कातकरी पाडा, मनवेल पाडा व पश्‍चिम भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले रस्त्याच्या कडेला आपले बस्तान मांडत आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसत आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारला असला तरी मात्र बाजारात खरेदीसाठी येणारे अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

नक्की वाचा : कोसेसरी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास; होडीतून पार करावी लागते धामणी नदी

ज्या ठिकाणी भाजीपाला व अन्य वस्तू विक्रेते बसत आहेत, त्यांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे उल्लंघन करून सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच मास्क न लावता फिरू नये. 
- दीपक म्हात्रे, अतिक्रमण अधिकारी. 

फेरीवाल्यांची संख्या वाढली
ज्यांचे रोजगार गेले आहेत ते भाजीपाला, मच्छी विक्रेत्यांसाठी काम करत आहेत. भंगारचालकांना भाडे देणेही शक्‍य न झाल्याने हातगाडीवर भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. आमच्याकडे दुसरे उपजीविकेचे साधन नाही, मुलांचे पुढील शिक्षण, तसेच घराचा आर्थिक भार अधिक असल्याने या व्यवसायात आलो, असे गौतम यादव यांनी सांगितले. 

(संपादन : वैभव गाटे)

Disruption of social distance due to peddlers in Vasai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption of social distance due to peddlers in Vasai