शीव-पनवेल मार्गावर सर्व्हिस रोडची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

शीव पनवेल मार्गावरील तुर्भे, शिरवणे, नेरूळ व उरण फाटा भागात उड्डाणपुलासह सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई ः शीव पनवेल मार्गावरील तुर्भे, शिरवणे, नेरूळ व उरण फाटा भागात उड्डाणपुलासह सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केव्हा हाती घेतले जाईल, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिरवणे उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचा वेगही मंदावू लागला आहे; तर नेरूळ, उरण फाटा या ठिकाणच्या उड्डाणपुलाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होऊ लागली आहे. जुईनगर स्टेशनपासून ते शिरवणे उड्डाणपुलाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो. तसेच सानपाडा गाव, जुईनगर स्टेशनपासून ते शिरवणे गावाकडे व अन्य ठिकाणाहून येण्यासाठी याच सर्व्हिस रोडचा वापर केला जातो. याशिवाय या रोडवर हलक्‍या वाहनांपासून अवजड वाहनांचीही अधिक वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून, वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात वाहनचालकांना धोके अंगावर घेत वाहने खड्ड्यांतून चालवावी लागणार का? असा सवाल वाहनचालकांकडून विचारला जात आहे. ठाणे-बेलापूर मार्गाच्या दुरुस्तीसाठी दर वर्षी जवळपास दीड कोटी खर्च केले जात असतानाही पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरश: चाळण होत आहे. त्यामुळे अपघातांची भीतीही बळावली आहे.

शीव पनवेल मार्गावरील शिरवणे येथे उड्डाणपूलाजवळील भुयारी मार्ग मद्यपींचा अड्डा बनला आहे. या भुयारी मार्गात खड्डे पडले असून, अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही . 
- वीरेंद्र म्हात्रे, रहिवाशी, नेरूळ. 

राज्य शासनाच्या अखत्यारित येत असूनही या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे मणक्‍याचे दुखणे त्रास देऊ लागले आहे.
- दीपेश शिंदे, वाहनचालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distress of Service Road on Shiv-Panvel road