कोरोनाची भीती, त्यात पाण्यावाचून हाल; दिवेकरांची समस्यांतून सुटका नाहीच...!

water shortage at Diva
water shortage at Diva

डोंबिवली : डोंबिवली आणि ठाणे या दोन्ही शहरांच्या मध्ये वसलेल्या दिवा शहरात कोरोनाच्या संकटातही नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी घरातील आर्थिक स्रोत घटल्यामुळे पैशांची चणचण सामान्य नागरिकांना जाणवते. त्यामुळे बहुतांश लोकांना टँकरचे पाणी विकत घेणे आता परवडेनासे झाले आहे. 

दिवा शहरात नागरिक दाटीवाटीने राहतात. एकीकडे लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहे. मात्र, दुसरीकडे पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे कानाडोळाही करत आहे. त्यामुळे जवळच्या पाणवठ्यावरून पाणी आणण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला तर जबाबदार कोण? असा संतापजनक सवाल दिवेकरांनी उपस्थित केला आहे.  

मुंब्रा कॉलनी, साबे विभाग, आर. बी. नगर, म्हात्रे आळी, नागवाडी, बंदर आळी, गावदेवी मंदिर, दिवा हायस्कूल परिसर, शनिवार वाडा, क्रिश कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते. याचा फायदा घेत टँकर लॉबी चांगलीच सक्रिय झाली असून लहान पाण्याच्या टँकरसाठीही हजार रुपये तर मोठ्या टँकरसाठी 1 हजार 700 रुपये दर आकारले जातात. नोकरीला सुट्टी, रोजगार ठप्प, वेतन नाही, जेवणाचेही हाल, त्यात पाणी विकत घेणे परवडत नाही म्हणून आम्हाला लांब जाऊन पाणी आणावे लागत असल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. 

दिव्यात नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अनेक लोक वसले आहेत. काही निवडक सोसायट्याच फक्त पाणी विकत घेतात, बहुतांश दिवेकरांना उन्हातान्हात पाण्यासाठी भटकावे लागते अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी दिली. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणार  लोक बाहेर पडत असून यापैकी एकाला तरी दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली तर जबाबदार कोण? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दिव्यात पाणी टंचाई कायम असून आता उन्हाळ्यात जास्त झळा सोसाव्या लागत आहेत. टँकर घेणे परवडत नाही. सध्या तितके पैसेही नसून पाण्यासाठी रोज घरा बाहेर पडावे लागत आहे. 
- वैशाली रोकडे, नागरिक

बहुतांश वेळा रिक्षा किंवा दुचाकीचा आधार घेत पाणी भरावे लागते. सध्या वातावरण खराब असून घरात पाणीच नसेल तर स्वच्छता कशी राखायची? पाणी भरण्यासाठी नागरिक विहिरी अथवा अन्य पाण्याचे स्रोत गाठत असून त्या ठिकाणीही गर्दी होत आहे. 
- संदीप धनावडे, नागरिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com