लॉकडाऊन काळात 'पूजा'चा हैदोस, तळिरामांची न पिताच जिरली!

मयूरी चव्हाण-काकडे
रविवार, 17 मे 2020

मद्याविना कासावीस झालेल्या तळिरामांना अनेक भामट्यांनी गंडा घातला. यात "तिच्या"च नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. मद्यप्रेमींकडून "तिने" मद्याच्या नावाखाली बक्कळ पैसेही उकळले. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून "पूजा वाईन्स" नावाचे बनावट वाईन शॉप. 
तळिरामांच्या असाह्यतेचा फायदा घेत भामट्यांनी अनेक वाईन शॉपच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले. यात बदलापूर ते डोंबिवली परिसरात "पूजा वाईन्स' आघाडीवर होते. त्यामुळे "पुजाचा नाद कोणी करू नका रे बाबांनो", अशी विनंती मद्यप्रेमी समाज माध्यमावर करत आहेत.

डोंबिवली : मद्याविना कासावीस झालेल्या तळिरामांना अनेक भामट्यांनी गंडा घातला. यात "तिच्या"च नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. मद्यप्रेमींकडून "तिने" मद्याच्या नावाखाली बक्कळ पैसेही उकळले. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून "पूजा वाईन्स" नावाचे बनावट वाईन शॉप. 
तळिरामांच्या असाह्यतेचा फायदा घेत भामट्यांनी अनेक वाईन शॉपच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले. यात बदलापूर ते डोंबिवली परिसरात "पूजा वाईन्स' आघाडीवर होते. त्यामुळे "पुजाचा नाद कोणी करू नका रे बाबांनो", अशी विनंती मद्यप्रेमी समाज माध्यमावर करत आहेत.

क्लिक करा : रुग्णवाहिकांचा तुटवडा! एनएमएमटीने लढवली नामी शक्कल

"दारूसाठी काय पण" असे म्हणत मद्य मिळवण्यासाठी अनेक तळिरामांनी लॉकडाऊन काळात वेगेवगळ्या क्लृप्त्या अवलंबल्याचे समोर आले आहे. आता घरपोच दारूची डिलिव्हरी देण्यास परवानगी मिळाल्याने मद्यपींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

बनावट वाईन शॉपचा अगदी खरा वाटेल असा पत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला जात आहे. ग्राहकाने संपर्क साधून ऑर्डर दिली की आधी 'गुगल पे'वरून पैसे द्या, मगच डिलिव्हरी दिली जाईल अशी अटही या भामट्यांकडून घातली जात आहे. मात्र, ग्राहकांनीही मद्याच्या अतिमोहापायी ऑनलाईन पैसे पाठवले की त्यानंतर संबंधित ग्राहकाचा नंबरच ब्लॉक केला जातो.

बदलापूर येथील तुषार साटपे यांनी सोशल मीडियावरील 'सिद्धी वाईन शॉप'ची जाहिरात वाचून त्यावर दिलेला पत्ता हा आपल्याच परिसरात असल्याने या पत्त्यावर वाईन शॉप आहे की नाही याची खातरजमा केली, तेव्हा संबंधित ठिकाणी कोणतेच वाईन शॉप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

अनेकांनी 1 हजार ते दीड हजार रुपये 'गुगल पे'वरून दिले असून लहानशा फसवणुकीसाठी कशाला पोलिस ठाण्याची पायरी चढायची? या विचाराने अनेकांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. मात्र सोशल मीडियावर अशा अनेक फसवणुकीचे किस्से शेअर केले जात आहेत. मुरबाडमध्येही बनावट वाईन शॉपच्या नावाने ग्राहकांना लुटणाऱ्या भामट्याविरोधात नुकताच तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींनो, थोडा संयम ठेवा अशी सांगण्याची वेळ आली आहे.

क्लिक करा : ऑनलाईन परवानगी मिळाली नाही! मग त्याने कुटुंबासह व्हिलचेअरवरून धरली घराची वाट

मद्याची घरपोच डिलिव्हरी सुरू झाली असून गुगल पै किंवा ऑनलाईन व्यवहार न करता डिलिव्हरी हातात आल्यावरच संपूर्ण पैसे ग्राहकांनी द्यावे. असे केल्यास फसवणूक टाळता येईल. आधी 50 टक्के रक्कम भरा किंवा पूर्ण रक्कम भरा असे सांगणारे लोक फ्रॉड (खोटे) आहेत.
- सुरेश आहेर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
डोंबिवली पोलिस ठाणे 

माझ्या एका मित्राने मद्यासाठी 'गुगल पे'वरून 900 रुपये एका बनावट वाईन शॉपवाल्याला दिले होते. मात्र अजून त्याला मद्य मिळाले नसून त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे. याबाबत मित्राने माहिती देऊन इतरांना सावध केले आहे.
-अभिषेक पवार, युवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud of alcoholics