'सहा महिने विभक्त राहणे घटस्फोटासाठी पुरेसे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी पती-पत्नी यांनी सहा महिने विभक्त राहणे पुरेसे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात 21 वर्षांच्या पत्नीने 23 वर्षांच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी पती-पत्नी यांनी सहा महिने विभक्त राहणे पुरेसे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात 21 वर्षांच्या पत्नीने 23 वर्षांच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू विवाह कायद्यातील कलम 14 नुसार पती-पत्नीला सहमतीने घटस्फोट घेता येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी निर्धारित काळ विभक्त राहणे बंधनकारक आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नी यांनी मतभेदांमुळे सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयाने त्यांना या तरतुदीनुसार घटस्फोट घेण्याची परवानगी दिली; मात्र किमान 18 महिने विभक्त राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले होते. त्या विरोधात या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. कुटुंब न्यायालयाने निर्धारित केलेला कालावधी कमी करण्याची मागणी त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. एम. एस. सोनक यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. याचिकादारांचा दावा न्यायालयाने मान्य केला आणि कुटुंब न्यायालयाला घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

18 महिन्यांचा कालावधी अयोग्य
विभक्त राहण्याबाबतचा निर्णय पती-पत्नीने घेतल्यामुळे त्यांना फेरविचारासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाते. या कालावधीतही ते निर्णयावर ठाम राहिल्यास सहमतीने घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू करता येते, असे न्यायालयाने सांगितले. सुनावणी आणि चौकशीत पक्षकारांकडून अधिक स्पष्टता येते. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने ठरवलेला 18 महिन्यांचा कालावधी अयोग्य आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

Web Title: Divorse Time High Court Decission