esakal | आर्थिक संकटात सापडल्याने डहाणूतील फुगे उत्पादक कामगारांची दिवाळी अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

balloon worker

कोरोना काळात हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला. सद्यस्थितीत तालुक्‍यात केवळ 8 फुगा कारखाने सुरू आहेत. उर्वरित सुमारे 42 कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कुशल-अर्धकुशल कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आर्थिक संकटात सापडल्याने डहाणूतील फुगे उत्पादक कामगारांची दिवाळी अंधारात

sakal_logo
By
चंद्रकांत खुताडे

डहाणू : राज्यासह देशातील विविध भागात रंगीबेरंगी फुग्यांचा पुरवठा करणारा डहाणूतील फुगे उत्पादनाचा व्यवसाय गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे ठप्प आहे. त्यामुळे या कारखान्यात काम करणारे कामगार, मजूर यांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे. स्थानिकांना रोजगार देणाऱ्या फुगा व्यवसायाला उतरती कळा लागल्याने व्यवसायात गुंतलेल्या हजारो कामगार, मजुरांना त्याचा फटका बसला आहे. 

हे ही वाचा : 'बिहार निकालांचा आकस न ठेवता, राज्यात छटपूजेला संमती द्या'; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सण उत्सव, समारंभाच्या सुशोभीकरणात महत्त्वाचे स्थान असलेल्या फुगा उत्पादनाचे डहाणू तालुक्‍यात दोन वर्षांपूर्वी 50 कारखाने होते. विशेष म्हणजे येथील दर्जेदार फुग्यांना देशासह विदेशातही चांगली मागणी होती. मात्र कोरोना काळात हा व्यवसाय पूर्णतः कोलमडला. सद्यस्थितीत तालुक्‍यात केवळ 8 फुगा कारखाने सुरू आहेत. उर्वरित सुमारे 42 कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कुशल-अर्धकुशल कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हजारो मजूर-कामगारांच्या हाताला काम नसल्याने ऐन दिवाळीत त्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. 

महत्वाची बातमी : मुंबईत गोवंशाचा मृत्यू झाल्यास गोशाळा मालकास नोंदणी बंधनकारक; महापालिकेचाच निर्णय

फुगेनिर्मिती करणारे कारखाने तोट्यात असल्याने मालकवर्गही चिंतेत आहे. काही मालक अन्य देशांतून फुगे आयात करून विक्री करत आहेत. श्रीलंका, म्यानमार, चीन या देशांतील फुग्यांना सध्या मागणी आहे. येथील फुगे अधिक टिकाऊ, रंगीबेरंगी व आकर्षक आहेत. तसेच, या फुग्यांचा दर वाजवी आहे. त्यामुळे कोरोना संकटात सापडलेल्या कारखानदारांना परदेशातील फुगे किफायतशीर ठरत आहेत; मात्र यामुळे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला तडा जात आहे. सरकारने या कारखानदारांना आर्थिक बळ दिल्यास हा व्यवसाय तग धरू शकेल. 

नक्की वाचा : यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

कोरोनामुळे फुगे निर्मिती व्यवसाय पूर्णतः डबघाईला आला आहे. अनेक कारखाने बंद पडले आहेत. शासनाने या व्यवसायाच्या उभारीसाठी साहाय्य करावे. 
- जिग्नेशभाई, फुगे कारखानदार 

या वर्षी कारखाना बंद असल्याने हाताला काम नाही. सुमारे 7 महिन्यांपासून बेकारीची समस्या वाढली आहे. मुला-बाळांना नवीन कपडे, घरात मिठाईसाठी पैसे नाहीत. त्यामुळे दिवाळी अंधारात जाणार आहे. 
- सुभाष पारधी, कामगार 

(संपादन : वैभव गाटे)

Diwali in the dark for balloon manufacturers workers in Dahanu