Mumbai : बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर

सांताक्रूझ आगाराच्या बस बंद; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल
mumbai
mumbaisakal

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करून लक्ष वेधले आहे. मात्र त्यांचे प्रश्न जैसे थे राहिल्याने ऐन दिवाळीत त्यंनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. सांताक्रूझ बेस्ट बस आगारातील शेकडो बेस्ट कर्मचारी आज अचानक संपावर गेले. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गेल्या सहा महिन्यांत कंत्राटी कामगारांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. कंत्राटी कामगारांना समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले, तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, नियुक्तीपत्र द्यावे आणि सुट्ट्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच निर्धारित वेतन दिले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक वेळा बेमुदत संप केल्याने संबंधित आगारातील बस चालवण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या संपामुळे बेस्टचेही नुकसान झाले आहे.

नियमानुसार सेवा न दिल्याने बेस्टने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र त्यानंतरही कामगारांच्या प्रश्नांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बेस्टचे कंत्राटी कामगार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत सांताक्रूझ डेपोमधील ३०० कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

मुंबई आंदोलनामुळे सांताक्रूझ बस आगारातील १०० पैकी एकही बस बाहेर न पडल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले. बोनस देण्याबाबत कंपनीने आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी कंत्राटी कामगारांनी आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात आले.  विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सांताक्रूझ बस आगारातील कंत्राटी चालक व वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले. या आगारातून १० मार्गांवर १०० बस चालवण्यात येतात. मात्र सकाळपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत एकही बस प्रवाशांच्या सेवेत धावली नाही. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही मार्गांवर स्वतःच्या बस चालवल्या. कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन देणे, पगार वाढ करणे ही जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. 

पोलिसांकडून सौम्य लाठीमार

आंदोलनाच्या ठिकाणी अनेक कंत्राटी कामगार आक्रमक झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अनेक आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आपली मागणी लावून धरली. त्यामुळेच या आक्रमक झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com