दिवाळी संपली, आता कामाला लागू या...! दक्ष नागरिक समूहाची डोंबिवलीकरांना साद

दिवाळी संपली, आता कामाला लागू या...! दक्ष नागरिक समूहाची डोंबिवलीकरांना साद

डोंबिवली : डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी, राज्यातील साक्षर शहरांच्या यादीत डोंबिवलीचे नाव घेतले जाते. असे असताना नागरी सुविधा मिळविण्याच्या बाबतीत आपण निरक्षर का? असा सवाल करून "आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी पुन्हा वळू या... डोंबिवलीकरांनो दिवाळी संपली, पुन्हा आपल्या कामाची सुरुवात करा...' अशी साद दक्ष नागरिक समूहाने डोंबिवलीकरांना घातली आहे. निवडणुकीच्या आधी डोंबिवलीतील जनतेचा जाहीरनामा तयार करून आपल्या नागरी हक्कासाठी एकत्रित येण्याचे आवाहन समूहाने एका व्हिडीओच्या माध्यमातून केले असून सध्या या व्हिडीओची चर्चा समाजमाध्यमावर जोरदार सुरू आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "डोंबिवली ऍक्‍शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स' म्हणजेच दक्ष नागरिक समूहाने जनतेचा जाहीरनामा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा नागरिकांकडून मागविण्यात आला असून त्यांचा एकत्रित जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधी या उपक्रमाची सुरुवात झाली. दिवाळीमुळे नागरिकांचे याकडे दुर्लक्ष होत होते. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी दक्ष समूहाने एक ध्वनिफीत तयार केली आहे. 

दिवाळी आता संपली असून आपल्या कामावर आपण पुन्हा लक्ष केंद्रित करू, डोंबिवलीच्या समस्या सोडविण्यासाठी केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी व समाजमाध्यमावर चर्चा करण्याऐवजी एकत्रित येऊन लढू या. डोंबिवलीकरांच्या एकीची गरज असून समस्यांविषयी आता आवाज उठविण्याची वेळ आली असल्याचे दक्ष समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

काय केलंय आवाहन 
डोंबिवली समस्यांचे माहेरघर, सोशिक नागरिकांचे शहर, असा ठपका शहरावर बसत असून, हा विषय आपण हसण्यावारी तर नेत नाही ना? राजकीय व्यक्ती, पक्ष आपल्याला गृहीत धरत नाही ना? याचा विचार करण्यास सांगितले जात आहे. मुंबई गाठण्यासाठी लोकलव्यतिरिक्त कोणतीही वाहतूक सुविधा या शहरात नाही. रेल्वेला सर्वाधिक महसूल देऊनही लोकल अपघातात डोंबिवलीकरांना आपला जीव गमवावा लागतो. डोंबिवलीतून जलद लोकल सोडली जात नाही. चला तर एक नागरिक म्हणून आपण आपल्या मागण्या आधी ठेवूया, एकत्र येऊन आगामी निवडणुकीच्या आधीच राजकीय पक्षाकडे समस्यांचा कृती आराखडा मागू या, असे आवाहन दक्ष समूहाने केले आहे. 

Diwali is over now lets get to work A daksh group appealed to the people of Dombivali
-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com