राजकिय रणधुमाळीत दिवाळीची खरेदी थंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

दिवाळी काही दिवसांवर आली असून शहरातील वाशी, एपीएमसी मार्केट, मॉल आदी भागात दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत ग्राहक दुकानाकडे फिरकत नसल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

नवी मुंबई : दिवाळी काही दिवसांवर आली असून शहरातील वाशी, एपीएमसी मार्केट, मॉल आदी भागात दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत ग्राहक दुकानाकडे फिरकत नसल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

मतदानामुळे मागील आठवड्यात सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे दिवाळी आता फक्त चार दिवसांवर येऊन ठेपली असली तरीही बाजारातील धावपळ आणि उलाढाल बघायला मिळत नाही. नोकरदारांचे पगारही लवकर होण्याची शक्‍यता कमी असल्याने; तसेच खासगी क्षेत्रात मंदीचे ढग असल्याने बोनसही मिळाला नसल्याने दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला आहे.

दिवाळी येण्यापूर्वीच १० ते १५ दिवस बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, लाईट, कपड्यांनी फुलून जातात. यंदा मात्र कमालीची मंदी असल्याचे शहरातील सर्व व्यापारी खुलेआम बोलू लागले आहेत. एक तर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली निवडणूक यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आल्याचे जाणवत आहे. २१ तारखेला मतदान आणि २४ ऑक्‍टोबरला निकाल लागल्यानंतर मात्र बाजारात गर्दी होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. राजकीय दिवाळी आधी म्हणत अनेकांनी अद्याप खरेदीसुद्धा केलेली नाही. निवडणुकांमुळे महिलांनी यंदा रेडिमेड फराळाला अधिक पसंती दिली. काहींनी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीला घाबरून ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिले आहे. शहरात पालिकेच्या कारवाईचा धसका घेतल्याने सणासुदीला विविध साहित्यविक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही कमी झाली आहे. 

‘राजकीय दिवाळी आधी’ म्हणत अनेकांनी अद्याप खरेदी केलेली नाही. निवडणुकांमुळे महिलांनी यंदा रेडिमेड फराळाला अधिक पसंती दिली; तर यंदा २४ तारखेनंतरच दिवाळीची खरेदी सुरू होणार असल्याचे दिसत आहे. 
- दिनेशभाई पटेल, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali shopping stoped in the political battle